Serious warning from former RBI Governor Raghuram Rajan : माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांचा गंभीर इशारा
New Delhi : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या सध्याच्या आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करत मोठा इशारा दिला आहे. बदलत्या जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भारताने अत्यंत सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ, शेजारी देशांशी तणावपूर्ण संबंध आणि भविष्यातील गुंतवणुकीचे धोके याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा आयात शुल्क अर्थात टॅरिफ लावला होता. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली, मात्र तरीही अमेरिकेने टॅरिफ कमी केले नाही. या पार्श्वभूमीवर भारताने थेट अनेक देशांशी मुक्त व्यापार करार करण्याचा मार्ग स्वीकारला. तरीसुद्धा या नव्या करारांमुळे भारताला मोठी आर्थिक कसरत करावी लागत असल्याचे राजन यांनी नमूद केले आहे.
Ajit Pawar death : बुलढाणा मेडिकल कॉलेजला ‘अजितदादां’चे नाव द्या; सर्वपक्षीय सभेत एकमुखी ठराव
सध्याच्या टॅरिफचा तात्काळ परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला नसला तरी, दीर्घकालीन दृष्टीने बदललेली जागतिक समीकरणे भारतासाठी घातक ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अमेरिका सातत्याने भारतावर विविध प्रकारचे आर्थिक निर्बंध लादत असताना, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचे विधान करत असल्याने या मैत्रीमागील वास्तव तपासण्याची गरज असल्याचे संकेत राजन यांनी दिले आहेत.
दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येऊन थेट महत्त्वाचे करार करत आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारासाठी चर्चा सुरू असतानाही शेवटपर्यंत ठोस करार न होणे, हे भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणासाठी चिंतेचे कारण असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे.
भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतचे संबंध सध्या तणावपूर्ण आहेत, तर चीनसोबतचे संबंध काही प्रमाणात सुधारले असले तरी चीनवर विश्वास ठेवणे कोणत्याही परिस्थितीत धोकादायक ठरू शकते, असे स्पष्ट मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. याशिवाय श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याशी भारताने आर्थिक आणि राजनैतिक संबंध अधिक मजबूत करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी या शेजारी देशांचे महत्त्व मोठे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशांतर्गत विकासाच्या मुद्द्यावर बोलताना, प्रत्येक शहरात मेट्रो प्रकल्प उभारण्याची गरज खरंच आहे का आणि त्या शहरांची आर्थिक क्षमता काय आहे, याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. केवळ प्रतिष्ठेच्या कारणासाठी मोठे प्रकल्प उभारणे धोकादायक ठरू शकते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
याशिवाय सध्याच्या परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय क्षेत्रात गुंतवणूक करताना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे रघुराम राजन यांनी सांगितले. जागतिक अनिश्चितता, व्यापार निर्बंध आणि बदलती राजकीय समीकरणे पाहता, चुकीचे निर्णय भारताला मोठ्या अडचणीत आणू शकतात, असे ते म्हणाले.
एकूणच भारत सध्या अत्यंत कठीण आणि निर्णायक टप्प्यावर उभा असून, आर्थिक धोरणे, परराष्ट्र संबंध आणि विकासात्मक निर्णय घेताना कोणतीही चूक परवडणारी नाही, असा ठाम संदेश रघुराम राजन यांनी दिला आहे.








