Chandrapur Congress : चंद्रपूरात काँग्रेसची अवस्था, ‘आधे उधर जावो, आधे इधर आओ’

What Congress doing in Chandrapur? A big question mark among the people! : चंद्रपुरात काँग्रेसचं चाललं तरी काय? जनतेत मोठे प्रश्नचिन्ह !

Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची सध्याची अवस्था पाहिली, तर शोले चित्रपटातील जेलरच्या भूमिकेतील असरानीचा तो गाजलेला संवाद आठवतो “आधे उधर जावो, आधे इधर आओ.” आज चंद्रपूर काँग्रेसमध्येही तसाच गोंधळ उडाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. वर्चस्वासाठी सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षात काँग्रेसचे नगरसेवक अक्षरशः दोन गटांत विभागले गेले असून पक्षाची दिशा, नेतृत्व आणि भवितव्य याबाबत जनतेत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष आता लपून राहिलेला नसून तो उघडपणे महानगरपालिकेच्या राजकारणात दिसू लागला आहे. एका बाजूला वडेट्टीवार, तर दुसऱ्या बाजूला धानोरकर असा थेट सामना सुरू असून या सत्तासंघर्षात नगरसेवकांची अवस्था ‘कोण कुणासोबत’ अशी संभ्रमावस्थेत अडकली आहे. जनतेच्या प्रश्नांवर लढण्याऐवजी काँग्रेसमधील नेते आपापल्या गटबाजीमध्ये अडकले असल्याचे चित्र दिसत आहे.

Ladki Bahin Yojana : एका कॉलवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू !

शुक्रवारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या 27 पैकी 13 नगरसेवकांना सोबत घेत नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी करत पक्षातील वादाला टोकाचा वळण दिले. या पावलामुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह रस्त्यावर आला. याची माहिती मिळताच माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या समर्थकांनी या प्रक्रियेला थेट आक्षेप घेत ही नोंदणी पक्षाच्या अधिकृत आदेशांनुसार नसल्याचा दावा केला. परिणामी, काँग्रेसमधील फूट अधिकच स्पष्ट झाली असून अंतिम निर्णयासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रकरण प्रलंबित आहे.

या संपूर्ण वादाच्या मुळाशी गटनेता पदाची खुर्ची आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही गटांशी चर्चा करून गटनेत्याचे नाव लवकरच जाहीर करू, असे सांगितले होते. मात्र वडेट्टीवार गटाकडून वसंता देशमुख, तर धानोरकर गटाकडून सुरेंद्र अडबाले या नावांवरून एकमत न झाल्याने काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी रखडली. अखेर धानोरकर यांनी स्वतंत्र निर्णय घेत गटाची नोंदणी केली आणि संघर्ष उघड झाला.

धानोरकर गटाकडून प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसारच गट स्थापन केल्याचा दावा करण्यात येत आहे. सुरेंद्र अडबाले यांची गटनेता म्हणून निवड झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी वडेट्टीवार गटाने 13 नगरसेवकांचा गट हा अल्पसंख्याक असल्याने त्यास मान्यता देऊ नये, असा ठाम पवित्रा घेतला आहे. 14 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा वडेट्टीवार गटाकडून करण्यात आला आहे.

एकीकडे देशपातळीवर गेल्या सुमारे बारा वर्षांपासून काँग्रेसची अवस्था विदारक होत असताना, स्थानिक पातळीवरही संघटनात्मक नियोजनाचा अभाव प्रकर्षाने जाणवतो आहे. कार्यकर्ते टिकवणे, जनाधार वाढवणे यासाठी ठोस रणनीती आखण्याऐवजी परंपरागत भांडणे, अंतर्गत वाद आणि गटबाजीच वाढताना दिसत आहे. अपयशाची मालिका सुरू असतानाही आत्मपरीक्षण करण्याऐवजी सत्तेच्या खुर्चीसाठीच नेते एकमेकांचे पाय ओढताना दिसत आहेत.

Akola Municipal Corporation : भाजपच्या गळाला शरद पवारांचे तीन नगरसेवक, ४४ जणांचा गट स्थापन

निवडणूक काळात विरोधकांवर जहरी टीका करत स्वतःला जनतेचा तारणहार म्हणवणारे नेते प्रत्यक्ष सत्तेच्या जवळ जाताच स्वहित आणि वर्चस्वाच्या लढाईत गुंतलेले दिसतात. त्याचा थेट फटका काँग्रेसच्या प्रतिमेला बसत असून महानगरपालिकेतील सत्तेची गणिते सांभाळण्याऐवजी पक्ष स्वतःच आत्मघातकी राजकारण करत असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 नगरसेवक असून त्यापैकी काँग्रेसचे 27 नगरसेवक आहेत. भाजपकडे 23 नगरसेवक असून उर्वरित जागा इतर पक्षांकडे आहेत. या संख्याबळाच्या राजकारणात काँग्रेसची फूट भाजपसाठी सुवर्णसंधी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

जनतेचे प्रश्न, शहराचा विकास आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी बाजूला ठेवून सुरू असलेल्या या सत्तासंघर्षामुळे चंद्रपूर काँग्रेस नेमकी कुठे चालली आहे, हा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागला आहे. नेतृत्वाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर ‘आधे उधर जावो, आधे इधर आओ’ या अवस्थेत अडकलेली काँग्रेस आणखी रसातळाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.