Vijay Wadettiwar-statement-on-chandrapur-municipal-corporation-dispute-in-Congress : चंद्रपूर मनपाच्या सत्तासंघर्षावर वडेट्टीवारांचे सूचक वक्तव्य, सी. वेणुगोपाल यांनी बोलावली बैठक
Chandrapur चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच आता टोकाला पोहोचला असून, काँग्रेसमधील अंतर्गत कलह थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद सोडवण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर, “उद्याच्या बैठकीनंतर सगळं संपेल,” असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असताना, पक्षातील दोन गटांमधील संघर्ष मिटवण्यासाठी हायकमांड काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे वाद कायमचा मिटणार की चंद्रपूरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले असून सत्ता स्थापनेसाठी केवळ सहा मतांची गरज आहे. मात्र, विजयानंतर लगेचच वडेट्टीवारांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना नागपूरला हलवल्याने वादाची ठिणगी पडली होती. याला प्रत्युत्तर म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी १३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करून वडेट्टीवारांना धक्का दिला.
यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी करून ‘धानोरकर गटाला महापौरपद आणि वडेट्टीवार गटाला स्थायी समिती सभापती’ असा तोडगा काढला होता. दोन्ही नेत्यांनी हा फॉर्म्युला मान्य केला असला, तरी पुण्यावरून चंद्रपूरकडे येणाऱ्या नगरसेवकांना धमकावण्याच्या प्रकारानंतर हा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे.
NCP leadership : राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर घमासान, प्रफुल पटेलांच्या भूमिकेकडे लक्ष !
या अंतर्गत वादामुळे महापालिकेतील हाती आलेली सत्ता जाण्याची भीती निर्माण झाल्याने आता दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, नगरसेवक गट स्थापनेसाठी आग्रही आहेत आणि वेळ अत्यंत कमी आहे. उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत जो निर्णय होईल, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. या बैठकीत हायकमांड कोणाच्या बाजूने कौल देते आणि चंद्रपूरच्या महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.








