Vijay Wadettiwar vs. Pratibha Dhanorkar power tussle: ”शिवी दिली तरी नेत्याला ऐकून घ्यावी लागते”, वडेट्टीवारांच्या विधानाने खळबळ
Nagpur राज्याच्या राजकारणात सडेतोड आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर महापालिकेच्या संघर्षात नमती भूमिका घ्यावी लागली आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या आक्रमक तटबंदीमुळे वडेट्टीवारांना महापालिकेचे अधिकार सोडून द्यावे लागले आहेत. “सध्याचे राजकारण बेईमानीचे झाले असून, कोणी शिवी दिली तरी ती ऐकून घेऊन नेत्याला पुढे जावे लागते,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे.
चंद्रपूर महापालिकेत महापौर कोणाचा बसणार, यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जुंपली होती. २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते.
Pune Municipal Corporation : तारीख ठरली; पुण्याला “या” दिवशी मिळणार हक्काचा महापौर
वडेट्टीवार यांनी काही नगरसेवकांना नागपूरला नेल्याने वादाला तोंड फुटले. “आमच्या नगरसेवकांना उचलून नेण्याची गरज काय? वडेट्टीवारांनी चंद्रपुरात लुडबूड करण्यापेक्षा राज्यभर फिरावे,” असा थेट टोला खासदार धानोरकर यांनी लगावला होता.
प्रतिभा धानोरकर यांनी १४ नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करून प्रदेशाध्यक्षांवर दबाव निर्माण केला. शेवटी पक्षश्रेष्ठींनी धानोरकर यांचा हट्ट मान्य करत महापौरपद त्यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला.
नेहमी आक्रमक असणाऱ्या वडेट्टीवार यांनी या पराभवानंतर अत्यंत संयमी पण व्यथित करणारी प्रतिक्रिया दिली आहे. “मी पक्षाचा नेता असल्याने प्रदेशाध्यक्षांचा आदेश पाळणार आहे. माझ्यासाठी पदापेक्षा पक्ष मोठा आहे,” असे सांगत त्यांनी मनातील नाराजी लपवून ठेवली. सध्याच्या परिस्थितीत कोणाला काही बोलता येत नाही. कोणी ‘अरे’ म्हटले तरी ‘कारे’ म्हणता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी स्वतःच्याच कोंडीचे वर्णन केले.
FIR filed against Rupali Thombre : सरकारी कामात अडथळा, रुपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा
महापौरपद पदरात पाडून घेतले असले, तरी आता खासदार धानोरकर यांच्यासमोर बहुमताचा आकडा गाठण्याचे मोठे आव्हान आहे.
बंडखोरांची भूमिका: काँग्रेसने तिकीट कापलेले दोन बंडखोर उमेदवार निवडून आले असून ते सध्या वडेट्टीवार यांच्या संपर्कात आहेत. महापौरपदाचा उमेदवार कोण आहे, हे पाहूनच ते आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पाठिंब्यावर काँग्रेसची मदार आहे. मात्र, वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यात धानोरकर यशस्वी होणार का, यावरच सत्तास्थापनेचे समीकरण अवलंबून आहे.








