Chandrapur : मुनगंटीवारांनी घेतला विसापूर येथील निर्माणाधीन एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा !

Sudhir Mungantiwar reviews SNDT Women’s University under construction in Visapur : कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत झाली बैठक

Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे उभारण्यात येत असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बांधकाम प्रगतीचा आढावा राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. यासाठी मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मुख्य परिसरात कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत विद्यापीठासाठी आवश्यक निधी, मुलभूत सुविधा, अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता तसेच शैक्षणिक विसाताराच्या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. यावेळी विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या कलात्मक चित्रफ्रेमद्वारे आमदार मुनगंटीवार यांचे स्वागत केले. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी १९०५ साली महिला आश्रमाच्या स्वरूपात लावलेले महिला सक्षमीकरणाचे रोपटे १९१६ साली एसएनडीटी विद्यापीठाच्या रुपात एक वटवृक्ष तयार झाले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी १५ कुटुंबांना मिळवून दिली सव्वा कोटीची नुकसान भरपाई !

येत्या ५ जुलै २०२५ रोजी एसएनडीटी विद्यापीठाला ११० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या संदर्भात आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दलदेखील यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीत आमदार मुनगंटीवार म्हणाले, महिला शिक्षण, आत्मनिर्भरता आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने बल्लारपूर येथे उभारण्यात आलेले महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल हे महिलांना केवळ नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर नोकरी निर्माण करणाऱ्या म्हणून घडवण्याचे कार्य करत आहे. या ज्ञान संकुलाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरणे घडवून आणले जात आहे. एसएनडीटी विद्यापीठ या प्रक्रियेला अधिक व्यापक व प्रेरणादायी दिशा देईल.