
guardian-minister-chandrashekhar-bawankule-advice-to-new-mayor-neeta-thackeray : नियोजन करा, निधी आम्ही देऊ’; पालकमंत्र्यांचा नव्या महापौरांना सल्ला
Nagpur “महापालिकेच्या शाळांचा दर्जा इतका सुधारा की, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या रांगा लागल्या पाहिजेत,” अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनियुक्त महापौर नीता ठाकरे यांच्याकडून व्यक्त केली.
नागपूर महानगरपालिकेवर पाच वर्षांसाठी भाजपचा भगवा फडकला असला, तरी नवनिर्वाचित महापौर आणि नगरसेवकांनी केवळ पाच वर्षांचा विचार न करता थेट २०४७ सालच्या नागपूरच्या विकासाचे ‘प्लॅनिंग’ करावे, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला. सोमवारी महापालिका मुख्यालयात पार पडलेल्या नवनिर्वाचित पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.
Anil Deshmukh : ओबीसींचा कॉलम का गायब?; जनगणनेवरून अनिल देशमुखांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“तुम्ही विकासाचे प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवा, त्यांना मंजुरी मिळवून देण्याची जबाबदारी आमची,” अशी मोठी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हातीबेड आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना कर्तव्याची जाणीव करून दिली.
“नागपूरच्या जनतेने तुम्हाला भरभरून मते देऊन सत्तेत बसवले आहे. हे मत म्हणजे एक प्रकारचे कर्ज असून, प्रभागातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करून त्याची प्रामाणिकपणे परतफेड करा,” असे आवाहन बावनकुळे यांनी केले. नागपूरला देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर बनवण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Anil Deshmukh : ओबीसींचा कॉलम का गायब?; जनगणनेवरून अनिल देशमुखांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
महापालिकेच्या खालावलेल्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर पालकमंत्र्यांनी बोट ठेवले. शहराची वाढती लोकसंख्या पाहता प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.
पुढील दोन दशकांमधील आव्हाने ओळखून काम करण्याचे आवाहन बावनकुळेंनी केले. ”आजच्या सोयीसुविधा भविष्यात तोकड्या पडणार आहेत. त्यामुळे २०४७ मध्ये नागपूरची गरज काय असेल, याचा विचार करून आत्तापासूनच केंद्र व राज्य सरकारकडे मोठे प्रस्ताव पाठवा,” असे त्यांनी सांगितले.
या प्रस्तावांना शासन स्तरावर कोणताही तांत्रिक अडथळा येऊ न देता मंजुरी मिळवून देण्याची हमी पालकमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
या सोहळ्याला आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी खासदार अजय संचेती, संजय भेंडे यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.








