Nagpur pattern of development of Pardhi community to be implemented across the Maharashtra state : प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पारधी समाजात शिक्षणाचे महत्त्व रुजले
Nagpur : आदिवासी पारधी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी राबवलेल्या ‘क्रांतिवीर समशेर सिंह पारधी शिक्षण सागर यात्रे’ने नागपूर जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवला आहे. 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा ‘नागपूर पॅटर्न’ राज्यभर राबवण्याचे संकेत त्यांनी दिले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी प्रकल्प पारधी विकास परिषदेने हा पथदर्शी उपक्रम राबवला. नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, माजी आदिवासी अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी नितीन ईसोकर यांच्यासह हिंगणा, कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, उमरेड आणि भिवापूर येथील प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी पारधी बेड्यांना भेटी देऊन विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन केले. या सामूहिक प्रयत्नांमुळे पारधी समाजात शिक्षणाचे महत्त्व रुजले आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली.
Adivasi Pardhi Development Council : क्रांतिवीर समशेरसिंह पारधी पॅकेजची घोषणा
नागपूर जिल्ह्यातील 42 पारधी बेड्यांवर शिक्षणाचा जागर घडवण्यासाठी या यात्रेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आदिवासी सेवक बबन गोरामन, परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल पवार, चांप्याचे माजी सरपंच अतिश पवार, मुख्याध्यापक प्रशांत गोरामन, राहुल राजपूत आणि सुशांत राजपूत यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत शिक्षणाच्या संधी आणि दीर्घकालीन फायद्यांबाबत जागरूकता निर्माण केली. समाजाच्या मूलभूत गरजा जसे की शिक्षण, आरोग्य आणि महसूल दाखले यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
जात प्रमाणपत्राअभावी अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अडकत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी तात्काळ पावले उचलली. 42 बेड्यांवर विशेष महसूल शिबिरांचे आयोजन करून 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रे प्रदान करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ झाला. तसेच, विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिरांचे आयोजन करून समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यात आल्या. नितीन ईसोकर यांनी गाव भेटी देऊन मूलभूत समस्यांचा आढावा घेत त्या सोडवण्यासाठी त्वरित कार्यवाही केली.
Vijay Wadettiwar : पोलिसांमध्ये काम न करता ‘सिंघम’ का संचारतो ?
‘क्रांतिवीर समशेर सिंह पारधी शिक्षण सागर यात्रा’ हा उपक्रम केवळ शिक्षण जागृतीपुरता मर्यादित नसून, पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श ठरला आहे. या उपक्रमामुळे समाजातील अनेक विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होत असून, त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नागपूर पॅटर्नच्या यशस्वीतेचे कौतुक करत, पालकमंत्री बावनकुळे यांनी हा उपक्रम राज्यभर राबवण्याची घोषणा केली.