Violation of revenue department rules in minister’s own district : कर्मचारी बदल्या व प्रतिनियुक्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन
Amravati जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी बदल्या व प्रतिनियुक्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्याशिवाय बदली प्रक्रिया सुरू करता येणार नाही, असा स्पष्ट आदेश दिला आहे.
विशेष म्हणजे, अमरावती जिल्ह्याचे पालकत्व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच असतानाही महसूल विभागाच्या नियमांची मोडतोड या जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसूल कर्मचारी संघटनेने १७ एप्रिल रोजी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयामुळे यंदाचे बदली अभियान अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपचे ‘यंग कार्ड’!
राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पालकत्वाखाली असलेल्या जिल्ह्यात महसूल प्रशासनातच नियमबाह्य बदल्या आणि प्रतिनियुक्त्या झाल्याचे प्रकार समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नियमांनुसार प्रतिनियुक्ती ही विशिष्ट परिस्थितीतच दिली जाऊ शकते आणि त्यासाठी मूळ आस्थापनाची ना-हरकत घेणे बंधनकारक असते. मात्र, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातून पाच जिल्ह्यांत कर्मचारी पाठवले गेले असून, कोट्याचे पालन झालेले नाही.
संघटनेच्या याचिकेनुसार, काही कर्मचारी १५-२० वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत असून, इतर कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोन वेळा बदलीला सामोरे जावे लागले आहे. ही असमतोलात्मक आणि अन्यायकारक पद्धत प्रशासनात पक्षपातीपणाचे चित्र स्पष्ट करते. हा प्रकार केवळ आयुक्त कार्यालयापुरता मर्यादित नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातही असे प्रकार घडल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
या सर्व गोंधळामुळे सामान्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, निवडक कर्मचाऱ्यांना मर्जीप्रमाणे स्थानिक सेवा मिळत आहे. न्यायालयाने बदल्यांपूर्वी सर्व तक्रारी ऐकण्याचे आदेश दिल्याने महसूल प्रशासनाला आता पारदर्शकता राखणे भाग पडणार आहे. यानंतर पालकमंत्री बावनकुळे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.