Kamthi tehsil office declared actual property of revenue minister Chandrashekhar bawankule : महसूलमंत्र्यांच्या मालमत्तेचा खरा आकडा आला समोर, बदनामी करणाऱ्यांना इशारा
Nagpur भाजपचे धडाडीचे नेते आणि राज्याचे विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मालमत्तेबाबत राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सातत्याने वावड्या उठवल्या जात होत्या. बावनकुळे यांच्याकडे हजारो एकर जमीन असून ते कोट्यवधींच्या मालमत्तेचे धनी असल्याचा दावा विरोधकांकडून वारंवार केला जात होता. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून त्यांच्या शेतजमिनीचा अधिकृत आकडा प्रशासकीय कागदपत्रांसह समोर आला आहे.
कामठी तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण २८.४४ एकर जमीन आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतीही अतिरिक्त जमीन नसल्याचे या कागदपत्रांतून स्पष्ट करण्यात आले आहे.
या स्पष्टीकरणानंतर बावनकुळे यांच्या कार्यालयाने आक्रमक पवित्रा घेतला असून, यापुढे कोणीही खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री म्हणून आपली छाप पाडल्यानंतर, आता महसूलमंत्री म्हणून बावनकुळे यांनी प्रशासकीय सुधारणांचा धडाका लावला आहे.
ब्रिटीशकालीन जाचक कायदे बदलण्यासोबतच त्यांनी ‘तुकडेबंदी कायदा’ रद्द करून लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे पिढ्यानपिढ्या प्रलंबित असलेले जमिनीचे वाद संपुष्टात आले असून अनेक शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर चढली आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेला पाणंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Sanjay Gaikwad-Rahul Bondre : चिखलीत पुन्हा राजकीय भूकंप? गायकवाड-बोंद्रे गुफ्तगूने पेटली चर्चा
हक्काची वाहिवाट अडवणाऱ्या मुजोर प्रवृत्तींना चाप लावण्यासाठी आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आणि अशा व्यक्तींना शासकीय लाभांपासून वंचित ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यांच्या या धाडसी निर्णयांचे कौतुक विधानसभेत विरोधकांनीही केले आहे. आपल्या कामातून विरोधकांना निरुत्तर करणाऱ्या बावनकुळे यांनी आता आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर करून अफवा पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.








