Chikhali Municipal Council : स्वीकृत सदस्यांत तिन्ही पक्षांचा समावेश, चिखली पालिकेत सत्तासंतुलनाचा खेळ

All three major parties included among the co-opted members : उपाध्यक्ष निवडीत तीन मतांनी कौल, राजकीय अपरिहार्यतेपुढे नेते शरण

Chikhali चिखली नगरपालिकेतील उपाध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीत उपाध्यक्षपदी शिंदेसेनेच्या वैशाली खेडेकर यांची निवड झाली, तर स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, भाजपचे सागर पुरोहित आणि सुरेंद्र ठाकूर यांची निवड करण्यात आली. या निकालामुळे पालिकेतील सत्तासमीकरणे आणि राजकीय अपरिहार्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

चिखली नगरपालिकेसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. दि. २१ डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपचे पंडितराव देशमुख यांनी नगराध्यक्षपदाचा विजय मिळवला. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात भाजपने १३ नगरसेवक निवडून आणत सत्ता मिळवली.

काँग्रेसचेही १२ नगरसेवक निवडून आले असले, तरी शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी एक जागा मिळाल्याने हे तिन्ही पक्ष निर्णायक भूमिकेत आले. याच संख्याबळाचा प्रभाव उपाध्यक्ष निवडीत स्पष्टपणे दिसून आला.

उपाध्यक्षपदासाठी भाजप–शिंदेसेना युतीकडून वैशाली कपिल खेडेकर, तर काँग्रेस–राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीकडून सुनीता प्रकाश शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले.

Malkapur Municipal Council : व्हीप एकाचा, स्वीकृत दुसराच; काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

या मतदानात वैशाली खेडेकर यांना १६ मते, तर सुनीता शिंगणे यांना १३ मते मिळाली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक डॉ. प्रकाश शिंगणे यांनी भाजप–शिंदेसेना युतीच्या बाजूने मतदान केल्याने खेडेकर यांच्या पारड्यात मते वाढली. तीन मतांच्या फरकाने वैशाली खेडेकर यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. खेडेकर यांच्यासाठी सूचक अश्विनी जाधव व अनुमोदक प्रिया बनसोडे, तर शिंगणे यांच्यासाठी सूचक डॉ. इसरार व अनुमोदक रत्नदीप शिनगारे होते.

स्वीकृत सदस्यपदी काँग्रेस–राष्ट्रवादी (अजित पवार) आघाडीकडून प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, तर भाजपकडून शहराध्यक्ष सागर पुरोहित व सुरेंद्र ठाकूर यांची निवड करण्यात आली.
पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्यासह पालिकेतील अधिकारी उपस्थित होते.

भाजपकडून स्वीकृत सदस्यपदी निवड झालेल्या सागर पुरोहित व सुरेंद्र ठाकूर यांना आमदार श्वेता महाले यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे बोलले जात असून, दोघांनाही ‘पक्षनिष्ठेचे फळ’ मिळाल्याची चर्चा आहे.

पालिकेतील संख्याबळ पाहता भाजप १३, काँग्रेस १२, तर शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) प्रत्येकी १ असे चित्र आहे. संख्याबळ जास्त असतानाही निर्णायक मतांसाठी एकमेव नगरसेवक असलेल्या पक्षांना महत्त्वाची पदे देणे, हा प्रमुख पक्षांचा राजकीय मोठेपणा की अपरिहार्यता, असा प्रश्न राजकीय जाणकार उपस्थित करत आहेत.

Bogus lease allocation : सुभाष कासनगोट्टूवारांना तात्काळ अटक करा!

नगरपालिका निवडणुकीपूर्वी व निवडणूक काळात चिखलीत मोठ्या राजकीय घडामोडी, आरोप–प्रत्यारोप आणि तणाव पाहायला मिळाला होता. मात्र आता उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर राजकीय वातावरण अधिक समोपचाराचे होत असल्याचे चित्र दिसत आहे.