Chief Minister Devendra Fadnavis has faith in the OBC community : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी समाजाला विश्वास
Satara : “ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. ओबीसींच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू. मराठा आरक्षण देताना देखील ओबीसींच्या हक्काला धक्का लागणार नाही,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
साताऱ्यात झालेल्या क्रांतिवीर उमाजी नाईक जयंती सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी रामोशी समाजाचा ऐतिहासिक लढा आणि योगदान याचा उल्लेख केला आणि ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकारने राबवलेल्या योजना मांडल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, “आमच्या सरकारची नीती स्पष्ट आहे एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही. मराठवाड्यात 1948 पर्यंत निजाम राज्य होतं, इंग्रजांचं नव्हतं. त्यामुळे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल.”
Shivendraraje : काँग्रेस – राष्ट्रवादींनी ओबीसी- मराठ्यांचा वापर केला
फडणवीस पुढे म्हणाले, “ओबीसींना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्यांचा विकास होणार नाही. ओबीसी समाजाचा विकास होईपर्यंत खरं शिवकार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कोणाच्याही मनात शंका ठेवू नका. तुम्ही मागण्या करत राहा, आम्ही शक्य आहे तेवढं देत जाऊ. आमचं सरकार ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात रामोशी समाजाचे शौर्य आणि उमाजी नाईकांच्या लढ्याची आठवण करून दिली. “रामोशी समाजाने नेहमीच देव, देश आणि धर्मासाठी लढा दिला. बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे विश्वासू गुप्तहेर होते. तर राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरोधात सेना उभी करून लढा दिला. रॉबर्ट म्हणत होता की उमाजी नाईक यांच्यात मोठे नेतृत्व गुण होते. पण फितुरीमुळे ते पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली.
इंग्रजांनी समाजाला गुन्हेगार ठरवून त्यांना दाबलं, त्यामुळे जवळपास 80 वर्षे हा समाज मागे पडला. आता सरकारचा प्रयत्न आहे की या समाजाला त्यांचा अभिमान आणि विकास पुन्हा मिळवून द्यायचा.”
फडणवीसांनी सांगितले की, रामोशी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकारने राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केले आहे. “या महामंडळामार्फत 15 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. दोन लाखांपर्यंत बिगर तारण कर्ज दिलं जाईल. हा समाज नोकरी शोधणारा न राहता नोकरी देणारा बनला पाहिजे. महाज्योतीमार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिलं जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
Chandrashekhar Bawankule : विजय वडेट्टीवारांनी डॉ. तायवाडेंचे मार्गदर्शन घ्यावे !
समाजाला संदेश देताना फडणवीस म्हणाले, “हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित नाही. तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवा. आता मागे राहून चालणार नाही. पुढे या, सरकार तुमच्या सोबत आहे. समाजाचा विकास थांबणार नाही.” मुख्यमंत्री फडणवीसांच्या या आश्वासनामुळे कार्यक्रमात उपस्थित ओबीसी आणि रामोशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून उत्साह व्यक्त केला.