Collector of Jalgao Jamod : मुख्याधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेविरोधात नगरसेवकांचा तीव्र निषेध

 

Corporators strongly protest against the biased stance of the Chief Executive : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; पदग्रहण कार्यक्रमात भेदभावाचा आरोप

Jalgao Jamod जळगाव जामोद नगर परिषदेच्या अध्यक्ष पदग्रहण कार्यक्रमासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडून कथित पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत निवडून आलेल्या नगरसेवकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नावे लेखी निवेदन सादर केले आहे.

निवडून आलेल्या सदस्यांचे म्हणणे आहे की, अध्यक्ष पदग्रहणाच्या निमित्ताने वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या शासकीय जाहिरातीत केवळ सत्ताधारी पक्षातील दहा नगरसेवकांचेच फोटो प्रसिद्ध करण्यात आले, तर उर्वरित अकरा निवडून आलेल्या नगरसेवकांना पूर्णतः डावलण्यात आले. ही बाब लोकशाही मूल्ये तसेच शासकीय निष्पक्षतेच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टवर सापडले ड्रग्ज?

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची ही कृती उघड पक्षपातीपणाचे उदाहरण आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय प्रभावापासून दूर राहून सर्व लोकप्रतिनिधींशी समान वागणूक ठेवणे अपेक्षित असताना, जळगाव जामोद येथे सुरुवातीपासूनच मुख्याधिकाऱ्यांचा कल एका विशिष्ट राजकीय पक्षाकडे असल्याचे दिसून येत असल्याने तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

नगर परिषदेच्या सर्व २१ नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यक्रमात समान व सन्मानपूर्वक सत्कार होणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पक्षपाती भूमिकेविरोधात निषेध म्हणून काही निवडून आलेल्या सदस्यांनी अध्यक्ष पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा निषेध कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, लोकशाही मूल्ये, जनतेचा कौल आणि संस्थात्मक निष्पक्षतेच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांनी रितेश देशमुख यांची मागितली माफी

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात मुख्याधिकाऱ्यांना निष्पक्ष राहून सर्व निवडून आलेल्या सदस्यांशी समान वागणूक ठेवण्याचे निर्देश द्यावेत, तसेच शासकीय जाहिराती व कार्यक्रमांमध्ये कोणताही राजकीय भेदभाव होणार नाही याची खात्री करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

या निवेदनावर काँग्रेस गटनेत्या संगीता विलास भारसाकळे तसेच निवडून आलेल्या नगरसेविका डॉ. समीना शाकीर खान, वैशाली निलेश तायडे, मिना राजेश सातव आणि फरजाना सय्यद अफरोज यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.