Congress’s attack Vote thief, leave.. campaign begins : काँग्रेसचा हल्लाबोल ‘वोट चोर, गद्दी छोड’ मोहिमेला सुरुवात
Kamathi : महाराष्ट्रात भाजपने मतदार यादीत धांदल करून 132 आमदार निवडून आणले, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ‘वोट चोर, गद्दी छोड’ या कॅम्पेनची सुरुवात कामठी येथून झाली. या सभेत काँग्रेस नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल केला.
सभे दरम्यान वडेट्टीवार म्हणाले, मोहन भागवत तीन मुलं पैदा करा म्हणतात, पण मतदार यादीत एका बापाला 56 मुलं दाखवली गेली. ही मत चोरीच आहे. महाराष्ट्रातील मतदारचोरांना धडा शिकवण्यासाठी ही सभा घेतली आहे. भाजपने जनादेश नाही तर मत चोरी करून सत्ता मिळवली आहे. शिवाय राज्य सरकारने मराठा-ओबीसींना एकमेकांविरोधात उभं करून संघर्ष पेटवला आहे.
Maratha Reservation : मराठा आरक्षण : तह, संघर्ष आणि नवा पेच!
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपला थेट आव्हान दिलं. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितलं आहे. देशात मध्यवर्ती निवडणुका लागणार आहेत. जनतेने आता ‘वोट चोर’ सरकारला उखडून टाकायचं आहे.
सभेत सुनील केदार यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधत म्हटलं, लोकसभेत 400 पारचा नारा दिला गेला कारण संविधान बदलायचा डाव होता. पण हा डाव उधळला जाईल. येत्या सहा महिन्यांत मोदी सरकार दिसणार नाही. सामान्य जनता रस्त्यावर आली तर तुम्हाला जागा राहणार नाही. आम्ही पंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत भाजपचा पराभव करून दाखवू.
ते पुढे म्हणाले, भाजपचे अधिकारी, कलेक्टर, पोलीस सगळे मुजरे करतात. पण आता हेच अधिकारी तुमच्या दारात उभे करून दाखवू. सुनील केदार तुम्हाला मुजरा करायला लावल्याशिवाय सोडणार नाही.
___








