Congress demands for compensation : अतिवृष्टीमुळे अमरावती व भातकुलीत शेतीचे प्रचंड नुकसान; मदतीची काँग्रेसकडून मागणी

Heavy rains cause huge damage to agriculture in Amravati and Bhatkuli : शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार भरपाई द्यावी; तिवसात युवा स्वाभिमान पार्टीकडून हेक्टरी १ लाख भरपाईची मागणी

Amravati अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे अमरावती आणि भातकुली तालुक्यातील शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुरुवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन याबाबत निवेदन सादर केले.

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश मोरे आणि श्रीकांत बोंडे यांनी केले.

१६ ते १९ ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस या मुख्य पिकांचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याशिवाय घरे, गोठे, गावातील रस्ते आणि पायाभूत सुविधांनाही फटका बसला आहे. काही शेतात अजूनही पाणी साचले असून नदी-नाले तुडुंब भरले आहेत. काही ठिकाणी घरे व गोठे वाहून गेले आहेत.

Revenue department : तहसीलदारांच्या निलंबनावरून राज्यभर कामबंदचा इशारा!

काँग्रेसने सादर केलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती, नाले खोलीकरण यासह तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे. मदत न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

या निवेदनादरम्यान हरिभाऊ मोहोड आणि हरिश मोरे यांच्यासोबत ॲड. अमित गावंडे, सचिन कोकाटे, शंतनू निचित, प्रज्ज्वल विघे, सुकुमार खंडारे, सुरेश मोरे, घनश्याम बोबडे, विनोद डांगे, बलवीर चव्हाण, शिल्पा महल्ले, वीरेंद्रसिंह जाधव, शैलेश काळबांडे, गोकुळ तायडे, सतीश गोटे, पंकज देशमुख, दिलीप सोनवणे, शेखर रिठे, मनोज अंबाळकर, हरिश्चंद्र पाटील, अरुण कोकाटे, प्रफुल्ल बदे, चेतन जवंजाळ, बंडूभाऊ पोहकार, अतुल यावलीकर, प्रमोद तसरे, मुकद्दर पठाण, अभय वंजारी, निलय कडू, दिनेश ठाकरे आदी उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिवसा तालुक्यात सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीने तहसीलदारांकडे केली.

यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार निंभोरा, डेहनी, शेंदुरजना बाजार, वरखेड, मोझरी, अनकवाडी, शिरजगाव मोझरी, सालोरा, धोत्रा या गावांमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे शेती खरडून निघाली आहे. वीज पडून जनावरे दगावली असून घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.

Protest for loan waiver : शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ‘काळा बैल पोळा’!

निवेदन देताना उपाध्यक्ष पवन भोजने, जिल्हा सचिव संदेश मेश्राम, तालुकाध्यक्ष कुणाल कडू, प्रवीण लादे, तुषार राउतकर, हरिचंद्र डांगे, नीलेश निवल, प्रिया गणोरकर, सचिन चौधरी, भूषण हरणे, संदीप चौधरीसह शेतकरी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून, शेतीशिवाय त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे. मदत न मिळाल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा मोहोड आणि मोरे यांनी दिला.