Along with two mayors, 79 corporators elected : स्थानिक स्वराज्य संस्थांत काँग्रेसची भक्कम कामगिरी
Amravati जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका तसेच दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांत काँग्रेस पक्षाने गतवेळेपेक्षा आपली कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारत राजकीय अस्तित्व भक्कम केले आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दर्यापूर आणि चिखलदरा या दोन नगरपालिकांवर सत्ता स्थापन करत मोठे यश मिळवले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे एकूण ७९ नगरसेवक निवडून आले असून, मागील निवडणुकीतील ४८ नगरसेवकांच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून दोन नगराध्यक्षांसह ७९ नगरसेवक विजयी होणे ही पक्षासाठी महत्त्वाची राजकीय उपलब्धी मानली जात आहे.
जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. निकालांवरून भाजपच्या बरोबरीने काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले स्थान कायम राखल्याचे स्पष्ट झाले आहे. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका आणि प्रभावी प्रचाराच्या जोरावर काँग्रेसने यावेळी मोठी झेप घेतल्याचे चित्र आहे.
निवडून आलेल्या ७९ नगरसेवकांमध्ये दर्यापूर १७, अचलपूर १५ आणि चिखलदरा १२ नगरसेवकांचा समावेश आहे. उर्वरित नगरपालिकांमधूनही काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.
Municipal Council : पहिल्याच सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित
या निकालानंतर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. स्थानिक पातळीवरील विकासकामे, जनतेशी असलेली नाळ आणि संघटनेची ताकद यांच्या बळावर काँग्रेस आगामी काळात आणखी मजबूत होईल, असा दावा त्यांनी केला.
ही निवडणूक खासदार बळवंत वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर केलेल्या प्रभावी कामाचेच हे यश असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.








