Congress Leaders Advice Forget Defeat, Get back to Work : काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा कार्यकर्त्यांना सल्ला
Amravati Congress लोकसभा निवडणुकीत खासदार बळवंत वानखडे यांच्या रूपाने काँग्रेसला यश मिळाले. तरीही विधानसभा निवडणुकीत मात्र मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. अमरावती जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे हा पराभव विसरून नव्या दमाने कामाला लागा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता सज्ज व्हा, असा सल्ला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस भवन येथे काँग्रेस जिल्हा ग्रामीणची कार्यकारिणी आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, तर प्रमुख अतिथी खासदार बळवंत वानखडे, हरीभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, कांचनमाला गावंडे, प्रवीण मनोहर, प्रदीप देशमुख, वासंती मंगरोळे, मुकद्दर खाँ पठाण, बाळासाहेब हिंगणीकर, संजय वानखडे, दयाराम काळे, संजय नागोणे यांची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष बबलू देशमूख यांनी विधानसभेचा पराभव विसरून कामाला लागण्याचा सल्ला दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकण्याकरिता जोमाने कामाला लागा, तसे नियोजन करा. पक्ष बळकटीकरिता गावागावातील काँग्रेस संघटन मजबूत करा. असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. या बैठकीला दिलीप काळबांडे, राजेंद्र नागपुरे, महेंद्रसिंह गैलवार, समाधान दहातोंडे, अजिज खान, राजाभाऊ उल्हे, सुनील गावंडे, अतिश शिरभाते, भाई देशमुख, दिलीप डाकोरे, शैलेश नाथे, राहुल गाठे, सच्चिदानंद बेलसरे, किशोर देशमुख, नामदेवराव तनपुरे, श्रीकांत झोडपे, गजानन टापरे, प्रदीप ज्ञानेश्वर देशमुख आदी उपस्थित होते.
स्वपक्षातीलच बंडखोरांचे आव्हान
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत धुसफूस दिसून आली. निवडणुकांच्या तोंडावर सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करीत विजय मिळविला. पक्ष संघटनेमध्ये सुनील देशमुख यांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याने त्यांचा गटही वेगळा पडला आहे. याशिवाय काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आपापल्या स्तरावर वेगळी चूल मांडून काम करताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्वपक्षातीलच बंडखोरांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Mahayuti Government : ५० लाखांच्या मागणीचा प्रस्ताव धूळखात !
काँग्रेसचा प्रभाव पडला नाही
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रहारची साथ मिळाली. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधातील असंतोष होता. यामुळे काँग्रेसला विजय मिळाला. त्यानंतरही महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीतील एकजूट टिकून राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.