Congress talent hunt : बाहेर टॅलेंट शोधताय, वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्यांचे काय?

buldhana-congress-talent-hunt-rahul-bondre-leadership-crisis : काँग्रेसमध्ये उठतोय आवाज, संघटना वाढवताना निष्ठावंतांना डावलले जातेय

Buldhana राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक बळकटीसाठी ‘टॅलेंट हंट’ अर्थात प्रतिभा शोध अभियान सुरू केले आहे. पारंपरिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित न राहता सुशिक्षित आणि अभ्यासू तरुणांना सक्रिय राजकारणात आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.

या अभियानांतर्गत पक्षासाठी नवीन प्रवक्ते, सोशल मीडिया समन्वयक आणि तळागाळातील नेतृत्व शोधले जाणार आहे. यासाठी केवळ राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांनाच नव्हे, तर वकील, डॉक्टर, इंजिनिअर्स आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झालेल्या तरुणांना दिल्ली आणि मुंबईत विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची पदे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

MLA Siddharth Kharat : विद्यमान आमदारांचे गावोगावी दौरे, माजी आमदारांनी मुंबईत ठाण मांडले!

मात्र, जिल्ह्यात काँग्रेससमोर खऱ्या अर्थाने नवी प्रतिभा शोधण्याची वेळ का आली, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी गळती लागल्याचे चित्र आहे. चिखली, मेहकर आणि मलकापूर सारख्या मतदारसंघांत पक्षाची ताकद क्षीण झाली असून, अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते महायुतीकडे वळले आहेत. अशा स्थितीत राहुल बोंद्रे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ही केवळ नवे चेहरे शोधण्याची नसून, पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याची आहे.

‘टॅलेंट हंट’ अभियानामुळे जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता दिसून येत आहे. “आम्ही वर्षानुवर्षे सतरंज्या उचलल्या आणि आता नवे लोक येऊन पदे घेणार का?” असा सवाल विचारला जात आहे. तसेच, या अभियानातून खरोखरच सर्वसामान्य घरातील ‘टॅलेंट’ पुढे येणार की पुन्हा प्रस्थापित नेत्यांच्याच मुला-मुलींना ‘प्रतिभावान’ ठरवून संधी दिली जाणार, यावरही मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

Sindkhed raja development : ‘तीन शिलेदार’ विधिमंडळात; आता तरी विकासाचा वनवास संपणार का?

जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी या अभियानातून खरोखरच नव्या विचारांचे आणि कार्यक्षम नेतृत्व पुढे आले, तरच काँग्रेसला संघटनात्मक बळ मिळू शकते. माजी आमदार राहुल बोंद्रे या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देतात की ही केवळ एक औपचारिकता ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.