Congress Vidarbha : महापालिका, नगरपालिकेत मोठा पराभव; आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलणार?

congress-district-president-change-after-local-body-polls-defeat-nagpur: गटबाजीमुळे विजयाने हुलकावणी दिल्याने पक्षश्रेष्ठी संतापले; नागपूर शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत

Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. बहुतांश स्थानिक संस्थांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी विजयाच्या समीप असताना केवळ नेत्यांमधील गटबाजीमुळे सत्ता गमवावी लागली. ही स्थिती पाहता आता काँग्रेस पक्षांतर्गत ‘मोठे ऑपरेशन’ करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याची सुरुवात जिल्हाध्यक्ष बदलण्यापासून केली जाणार असून, संपूर्ण कार्यकारिणीतच बदल केला जाणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १४ खासदार निवडून आल्याने पक्षाला लवकरच ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा वाटत होती. संविधानाचा मुद्दाही राज्यभरात तापला होता. त्यामुळे ‘आता विधानसभा आपलीच’ असा समज सर्वांनी करून घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि पक्षाचे केवळ १६ आमदार निवडून आले. महाविकास आघाडी एकत्र असूनही ५० आमदारांचा आकडा गाठता आला नाही.

Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी चालक दहा महिन्यांपासून ‘उपाशी’; अनुदानाविना केंद्र चालवणे कठीण

त्यानंतर झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीतही काँग्रेसची पीछेहाट झाली. नागपूरमध्ये गेल्या आठ वर्षांत काँग्रेस नगरसेवकांची संख्या केवळ चारने वाढली आहे. शहरात काँग्रेसचे दोन आमदार आहेत; तसेच दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. मात्र, हे यश महापालिका निवडणुकीत टिकवता आले नाही.

विदर्भात केवळ चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे विरोधकांपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले, तरीही सत्तेचे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे हातची सत्ता गेल्याने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आता संपूर्ण कार्यकारिणी बदलण्याचे ठरवले असून, या माध्यमातून प्रस्थापित नेत्यांना धक्के दिले जाणार असल्याचे समजते.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… कर्जमाफीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या हालचालींना वेग

आमदार विकास ठाकरे मागील १२ वर्षांपासून नागपूर शहराध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वात २०१७ आणि २०२६ ची महापालिका निवडणूक लढवण्यात आली. २०१७ मध्ये काँग्रेसचे २९, तर आता ३४ नगरसेवक निवडून आले आहेत. दुसरीकडे, नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन रामटेक विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्याकडील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बाबा आष्टनकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मात्र सात महिन्यातच त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले.

Sharad Pawar : वस्ताद पुन्हा मैदानात उतरणार? शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

त्यांच्याऐवजी माजी मंत्री सुनील केदार यांचे समर्थक आश्विन बैस यांना ग्रामीणचे अध्यक्ष बनवले गेले. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड घोळ घातल्याचा आरोप आहे. निवड समितीला डावलून बैठका घेतल्याने आणि उमेदवार निवडीत गदारोळ झाल्याने काँग्रेसला नगरपालिकेत मोठा फटका बसला आहे.