Corruption in the Deed Registration Office : भ्रष्टाचाराच्या विरोधात मनसेचा एल्गार; आज होणार दणक्यात आंदोलन !

MNS’s protest against corruption; Massive protest to be held today : दस्त नोंदणी कार्यालयातील भ्रष्टाचारा विरोधात कार्यकर्ते आक्रमक

Nagpur : राज्यातील दस्त नोंदणी कार्यालयातील भ्रष्टाचार आणि दलालीच्या काळा कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मनसेचे नागपूर शहर अध्यक्ष चंदू लाडे यांच्या नेतृत्वात आज दुपारी एक वाजता नागपूरच्या सिव्हील लाईन्स मधील नोंदणी उपनिरीक्षक निरीक्षक कार्यालयाबाहेर दणक्यात आंदोलन होणार आहे.

या आंदोलनाची घोषणा होताच शहरातील मनसे सैनिकांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिकांची होणारी लूट आणि फाईल पुढे नेण्यासाठी चालणारा भ्रष्टाचार याला मूठ माती देण्यासाठी मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करत जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे शहराध्यक्ष लाडे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितले. दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, अशी नागरिकांची सतत तक्रार येत आहे. भूमी व्यवहार नोंदणी व दस्तावेज प्रक्रियेत दलालांचा उच्छाद वाढल्याने सामान्य लोक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आता थेट रस्त्यावर उतरून या भ्रष्ट कारभाराचा समाचार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Amravati Police : गृहराज्यमंत्री, क्रीडा राज्यमंत्र्यांच्या बंदोबस्ताला दांडी!

सिविल लाईन्समधील प्रशासकीय इमारत क्रमांक दोन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक शहराच्या विविध भागांतून एकत्र होण्यास सुरुवात झाली आहे. हातात भगवा झेंडा घेऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. घोषणाबाजी केल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. मनसे ही जनतेसाठी लढणारी संघटना आहे, असे म्हणत लाडे यांनी सरकारी विभागातील भ्रष्टाचाराविरुद्ध उघडपणे भूमिका घेतली आहे.

Bacchu Kadu Pravin Tayde : लाखाचे बक्षीस आणि कडू-तायडे आमनेसामने!

मनसेचे हे आंदोलन राज्यातील भूमी व्यवहार आणि नोंदणी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला नव्याने उजाळा देऊ शकते. नागपूर हे राज्य सरकारच्या प्रशासकीय आणि राजकीय केंद्रांपैकी एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल मोठ्या प्रमाणावर घेतली जाईल, असे मानले जात आहे. मनसेच्या या आंदोलनामुळे नागपूरचे राजकीय तापमान वाढणार, असे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे.