school-education-minister-dada-bhuse-warning-on-teacher-recruitment-without-pavitra-portal : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा कठोर इशारा, लवकरच एसओपी लागू
Mumbai : पवित्र संगणक प्रणाली डावलून करण्यात आलेल्या शिक्षक भरतीला कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. काही शिक्षण संस्थांनी पवित्र पोर्टल बंद असल्याचा गैरफायदा घेत शिक्षकांची रिक्त पदे स्वतःच्या स्तरावर भरल्याचे समोर आले असून अशा नियुक्त्या शासनाच्या धोरणाशी विसंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेतील तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही भूमिका मांडली.
माहितीनुसार, पवित्र संगणक प्रणाली काही काळ बंद असताना अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षकांची रिक्त पदे थेट भरल्याची प्रकरणे समोर आली होती. या नियुक्त्यांना मान्यता देण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाने त्या काळातील शिक्षक नियुक्त्यांना मान्यता देण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य शासनाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली असून त्यावर अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतरही पोर्टलचा वापर न करता करण्यात आलेल्या शिक्षक नियुक्त्यांची तपासणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समित्यांच्या माध्यमातून अशा नियुक्त्यांची चौकशी केली जाणार आहे.
ठाकरे गटाचे दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. पवित्र पोर्टलला डावलून अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती केल्याचे समोर आले असून अशा भरतीबाबत शासन काय भूमिका घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
या प्रकरणी यापूर्वीही काही शिक्षण संस्थांनी जुन्या मान्यता दाखवत शिक्षक भरती केल्याचे उघड झाले होते. या संदर्भात विशेष चौकशी पथक तपास करत असून अनेक शिक्षण संस्थाचालक, संबंधित कर्मचारी आणि शालेय शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिक्षक भरती प्रक्रियेत संस्थाचालकांची मनमानी थांबवण्यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी फडणवीस सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पवित्र पोर्टल प्रणाली सुरू केली होती. मात्र काही संस्थाचालक आणि विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने पोर्टलला डावलून शिक्षक भरती करण्याचे प्रयत्न सुरूच असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे पवित्र पोर्टलमार्फतच पार पडावी यासाठी लवकरच मानक कार्यपद्धती म्हणजेच एसओपी लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टलशिवाय करण्यात आलेल्या शिक्षक नियुक्त्या शासनाच्या धोरणाशी विसंगत असल्याने त्यांना मान्यता दिली जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.








