The passenger died due to brutal beating : बेदम मारहाणीत प्रवाशाचा श्वास थांबला
Nagpur माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. मला परत करा, अशी विनवणी करणार्या प्रवाशाला जनरल बोगीतील चोरांनी बेदम मारहाण केली. चारही आरोपी त्याच्यावर तुटून पडले. छाती, पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तो खाली कोसळला. रक्ताची उलटी झाल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. धावत्या रेल्वेतच त्याचा श्वास थांबला. शशांक राज (25) रा. राजापूर, उत्तरप्रदेश असे मृतक प्रवाशाचे नाव आहे.
अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना दक्षिण एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत लोहमार्ग पोलीस अधीक्षक प्रियंका नारनवरे यांनी रेल्वेस्थानकावर पाहणी केली. मो. फैयाज (19), सयद समीर (18), एम. शाम राव (21) आणि मो. अमान अकबर (19) सर्व रा. सिकंदराबाद असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रवास रेल्वेचा असो की आयुष्याचा स्टेशन आले की थांबावेच लागते. परंतू बळजबरीने कोणी प्रवासातून बाद करीत असेल तर…? अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, या घटनेत पोलिस नव्हतेच. जनरल बोगीतील प्रवासी आणि मृतकाच्या मित्रांनी घटनाक्रम सांगितला. आंध्राचा (कागजनगर) एक पोलिस जनरल बोगीत आला. मात्र, कुठलीच कारवाई न करता तो निघून गेला.
विशेष म्हणजे बेदम मारहाण केल्यानंतरही आरोपी त्याच बोगीत होते. पहाटे साजडेतीन वाजता मारहाण झाली. सकाळी सहा वाजता त्याचा श्वास थांबला. तो कुठलीच हालचाल करीत नसल्याचे पाहून डब्यातील प्रवाशांचाही संयम सुटला. त्यांनी चारही आरोपींना पकडून ठेवले. महाराष्ट्राच्या बल्लारशा स्थानक परिसरात काही आरपीएफ जवान डब्यात चढले. त्यांच्याकडून लोहमार्ग नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी आली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी जनरल बोगीतील आरोपींना ताब्यात घेतले. प्रकरण तेलंगाना (मंचेरीयन) लोहमार्ग पोलिसांनाकडे वर्ग करून कारवाईसाठी आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
असा आहे घटनाक्रम
मृतक शशांक आणि त्याचा मित्र कपील हे दोघेही धान कापण्यासाठी सिकंदराबादच्या पुढे ग्रामीण भागात गेले होते. धान कापणी पूर्ण झाल्यानंतर कामाचे पैसे घेऊन दोघेही 12721 दक्षिण एक्स्प्रेसने नागपूरच्या दिशेने निघाले. इंजिनपासून पहिल्याच जनरल कोचमधून प्रवास करीत होते. नागपुरातून मुळ गावी जाणार होते. त्याच डब्यात आरोपीसुध्दा होते.
चारही आरोपी पोलिस अभिलेखावर आहेत. शशांक आणि त्याचा मित्र झोपेत असताना आरोपींनी शशांकच्या खिशातील 1700 रुपये घेतले. कपीलच्या खिशातील मोबाईल चोरला. शशांकला जागी आली त्याने आरोपींना रंगेहात पकडले. शशांकने आरोपींना पैसे परत करण्याची विनवणी केली. मात्र, आरोपी पैसे न देता त्याच्यावर तुटून पडले. आरोपींनी डब्यातील प्रवाशांनाही धमकी दिली होती.