Chief Minister’s big announcement regarding logistics, highways, ports and airport expansion : महाराष्ट्राच्या औद्योगिक, लॉजिस्टिक आणि वाहतूक पायाभूत विकासाला नवीन गती
Nagpur : महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (१५ नोव्हेंबर) मोठ्या घोषणा केल्या. नागपूरला लॉजिस्टिक हब बनवण्यासाठी, राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि उद्योगांना मोठी चालना देण्यासाठी या प्रकल्पांचा निर्णायक प्रभाव होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
XSIO कंपनीने समृद्धी महामार्गालगत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून आधुनिक लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. नागपूरसाठी हा महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. या प्रकल्पात जगप्रसिद्ध ब्लॅकस्टोन या एसेट मॅनेजमेंट कंपनीची गुंतवणूक असल्याने प्रकल्पाची विश्वासार्हता अधिक वाढली आहे. ते म्हणाले, या लॉजिस्टिक पार्कमुळे नागपूरचे लॉजिस्टिक हब म्हणून उभारणीचे स्वप्न साकार होणार असून, राज्यात आणखी सप्लाय-चेन पार्क्स उभारले जातील.
वाढवणचे जगातील टॉप १० बंदरांमध्ये स्थान..
वाढवण बंदराच्या उभारणीचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की हे बंदर जगातील पहिल्या दहा महत्त्वाच्या बंदरांमध्ये गणले जाईल. समृद्धी महामार्गाचे इगतपुरीपासून वाढवण बंदरापर्यंत एक्स्टेंशन करून स्वतंत्र ॲक्सेस-कंट्रोल एक्स्प्रेसवे उभारण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व भागांमधून वाढवण बंदरापर्यंतची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि व्यापारात मोठी वाढ होईल.
लॉजिस्टिक पॉलिसीअंतर्गत MIDC ची महत्त्वाची भूमिका..
राज्यातील लॉजिस्टिक विकासासाठी तयार केलेल्या धोरणानुसार MIDC खाजगी गुंतवणुकीसाठी फॅसिलिटेटर म्हणून कार्य करत आहे. परवानग्या, आवश्यक पायाभूत सुविधा आणि स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणूनची जबाबदारी MIDC प्रभावीपणे पार पाडत असल्याचे मुख्यमंत्री फढणवीस यांनी सांगितले.
शक्तीपीठ एक्सप्रेसवेची ७० टक्के अलाइनमेंट..
राज्याच्या धार्मिक, पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा शक्तीपीठ एक्सप्रेसवे वेगाने पुढे जात असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. सुमारे ७० टक्के अलाइनमेंट निश्चित झाली असून उर्वरित ३० टक्क्यांसाठी दोन पर्यायांचा विचार सुरू आहे. संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्णत्वास जात असून त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन जमीन अधिग्रहण सुरू होणार आहे.
नागपूर विमानतळ विस्ताराला हिरवा कंदील..
नागपूर विमानतळ विस्तारासंबंधी सर्व अडथळे दूर झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, लवकरच विस्ताराच्या कामाला सुरुवात होईल. यामुळे कार्गो, प्रवासी संख्या, रोजगार आणि गुंतवणूक या सर्व क्षेत्रांत नागपूरला मोठा फायदा होणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे नागपूर आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, लॉजिस्टिक आणि वाहतूक पायाभूत विकासाला नवीन गती मिळणार आहे.








