Maharashtra CM Devendra Fadnavis dismisses speculation spread by Sanjay Raut about his move to Delhi : फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार असल्याचा राऊतांनी केला होता दावा
New delhi मी कुठेही असलो तरी माझ्या दिल्लीत जाण्याच्या चर्चा रंगतच असतात. काही लोकांना मी महाराष्ट्रातून दिल्लीत जावे असे मनापासून वाटते, त्यामुळेच ते अशा चर्चांना हवा देत असतात. कोणी पतंग उडवतंय तर कोणी फुगे… त्यांना ते उडवून आनंद घेऊ द्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे आणि मी महाराष्ट्रातच राहणार, अशा कडक शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली प्रयाणाच्या चर्चा फेटाळून लावल्या.
उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात शिक्षणमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. आपल्याकडे याबाबत खात्रीलायक माहिती असल्याचा दावाही राऊतांनी केला होता. आज दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर भाष्य करत राऊतांच्या दाव्यांतील हवा काढून घेतली.
मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विकासप्रकल्पांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध प्रकल्पांना केंद्र सरकारने आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही जेव्हा जेव्हा विकासाचे प्रकल्प घेऊन दिल्लीत येतो, तेव्हा पंतप्रधान मोदींकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद आणि आर्थिक मदत मिळते. पुणे मेट्रो रेल्वेची सध्या चाचणी (टेस्टिंग) सुरू असून, या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना अॅडव्हान्स निमंत्रण दिले आहे.
तसेच दिल्ली-नागपूर कॉरिडॉरअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात ६ हजार एकर जागेवर एमआयडीसी आणि इंडस्ट्रियल पार्क विकसित केले जात असून, यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्राला अधिकाधिक इंडस्ट्रियल पार्क मिळावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.








