Every devotee visiting Deekshabhoomi is important to us : दिक्षाभूमीत येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्वाचा
Nagpur : महाराष्ट्रात यावर्षी पावसाने हाहाकार उडवला. राज्याची उपराजधानी नागपुरातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसरा तोंडावर आला आहे. कालपासून (३० सप्टेंबर) दिक्षाभूमीवर अनुयायी येणे सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत पाऊस आल्यास त्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी शाळा व वसतिगृहांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय सुनिश्चित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, दिक्षाभूमीला येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्वाचा आहे. कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच बैठक घेतली. बैठकीत माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. त्यांच्या सुचनांचाही यावेळी विचार करण्यात आला. दिक्षाभूमीवर पाणी साचणे, राहण्याची अपुरी सोय, शौचालयांची कमतरता या तक्रारींवर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Crop Inspection Deadline : आता ३१ ऑक्टोबरपर्यंत होणार पीक पाहणी !
दिक्षाभूमीच्या जुन्या विकास आराखड्यावर आक्षेप नोंदवले गेले होते. या धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर सुधारित आराखडा तयार करून त्यावर अंमलबजावणी केली जाईल, असे महसूल मंत्र्यांनी सांगितले. यावेळी राज्यात झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात ते म्हणाले, येत्या पाच ते सहा दिवसांत राज्यभरात सर्वेक्षण पूर्ण केले जाईल. ऑगस्ट महिन्यात २५ लाख हेक्टर तर सप्टेंबरमध्ये आतापर्यंत २२ लाख हेक्टरवर शेतींचे नुकसान झाले आहे. मात्र हा आकडा अंतिम नाही. पुढील काही दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पूर्ण नुकसान भरपाई देणे शक्य नसले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चितपणे मदत केली जाईल.








