khamgaon-property-tax-hike-protest-rana-sananda-appeal-public-response : नगरपालिका प्रशासनाच्या मनमानी करवाढीविरोधात व्यापाऱ्यांचे नगराध्यक्षांना निवेदन
Khamgao खामगाव नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता शहरातील राजकीय वातावरण ‘वाढीव मालमत्ता करा’च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तापले आहे. प्रशासनाने लादलेल्या या भरमसाठ करवाढीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, व्यापाऱ्यांनीही आता याविरोधात रणशिंग फुकले आहे.
व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांची भेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. मात्र, हा विरोध केवळ एका वर्गापुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक व्हावा, यासाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आता ‘सामूहिक लढ्या’चे आवाहन केले आहे.
शहरातील करवाढीचा मुद्दा अनेक दिवसांपासून गाजत आहे. वकील संघटना, काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक आपापल्या परीने विरोध नोंदवत आहेत. सध्याचा विरोध वेगवेगळ्या गटांमार्फत होत असल्याने प्रशासनावर त्याचा अपेक्षित दबाव निर्माण होताना दिसत नाही. हीच पोकळी ओळखून राणा सानंदा यांनी पक्षभेद विसरून सर्व खामगावकरांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “जेव्हा जनता स्वतः रस्त्यावर उतरते, तेव्हाच प्रशासनाला नमते घ्यावे लागते,” असा संदेश त्यांनी दिला आहे.
Mahayuti Government : गावगाड्याची धुरा ‘मुदत संपलेल्या’ सरपंचांकडेच ठेवा; पर्यायी व्यवस्थेची मागणी
गुरुवारी झालेल्या भेटीत व्यापाऱ्यांनी करवाढीमुळे व्यवसायावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली. मालमत्ता करात करण्यात आलेली वाढ ही तर्कहीन असून ती सर्वसामान्य करदात्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. जर प्रशासनाने या करवाढीचा पुनर्विचार केला नाही, तर शहरातील व्यापार बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे संकेतही व्यापारी वर्गाने दिले आहेत.
Khamgao Municipal Council : खामगाव नगरपरिषदेचा ‘बुलढाणा पॅटर्न’; पहिल्याच सभेत विकासकामांचा धडाका!
शहरात सानंदा यांच्या आवाहनानंतर दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत. भाजपला साथ देणारा एक मोठा वर्ग सानंदा यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी होणार का? हा कळीचा प्रश्न आहे. सत्ताधारी भाजप समर्थक या करवाढीला ‘विकासासाठी आवश्यक’ मानणार की स्वतःच्या खिशाला बसणाऱ्या कात्रीमुळे विरोधकांच्या गोटात सामील होणार, यावर आंदोलनाचे भवितव्य अवलंबून असेल.








