Ajit Pawar’s hospital visit linked to Salil Deshmukh’s resignation : अजित पवारांच्या रुग्णालयातील भेटीचा राजीनाम्याशी संबंध ?
Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी दिलेला राजीनामा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत आहे. राजीनाम्यासाठी सलील देशमुख यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले आहे. पण हे कारण कुणालाही पटत नाहीये. याच पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले असल्याची पुष्टी मिळाली आहे.
पक्षाशी निष्ठा जपणारे आणि शांत स्वभावामुळे ओळखले जाणारे सलील देशमुख यांचा हा निर्णय अचानक वाटत असला तरी, त्यामागे घरातील आणि पक्षातील अंतर्गत मतभेद कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या विरोधात काम केलेल्या राहुल देशमुखांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचा निर्णय आणि त्यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे करण्याची भूमिका हे मतभेदांचे मुख्य कारण ठरल्याचे सांगितले जाते. देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचेही समजते.
या पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांची पक्षातील भूमिका आणि राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने राहुल देशमुखांना दिलेल्या संधीबाबत अनिल देशमुख यांच्या इतर समर्थकांचीही नाराजी असल्याची माहिती पक्षातील आतल्या सूत्रांकडून मिळत आहे. या वाढत्या दरीमुळेच अखेर सलील देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या राजीनाम्याच्या कथित राजकीय पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले जात आहे. काही दिवसांपूर्वी आजारी असताना सलील देशमुख रुग्णालयात दाखल होते, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आता राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ही भेट चर्चेत आली असून, त्याचा या निर्णयाशी काही संबंध आहे का, यावरही तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Local body election : भाजपचे अजितदादांच्या ‘होमग्राउंड’वर मोठे जाळं;
सलील देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या संघटनात्मक समीकरणांवर परिणाम होणार हे निश्चित. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे. पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे.








