Disha Salian case handed over to the CBI; relief for Aaditya Thackeray ‘ दिशा सालियान प्रकरण सीबीयाकडे, तपासाची दिशा केली निश्चित
Mumbai उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासाठी कायदेशीर दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यभरात गाजलेल्या दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने आता सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करताना कोणालाही संशयित किंवा आरोपी समजून वागणूक देऊ नये, तर केवळ चौकशी आणि जाबजबाब नोंदवावेत, असे स्पष्ट करत न्यायालयाने तपासाची दिशा निश्चित केली आहे.
मॉडेल आणि सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला होता. भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक सत्ताधारी नेत्यांनी या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आदित्य ठाकरे यांच्या या घटनेतील सहभागावरून सातत्याने राजकीय वक्तव्ये आणि चिखलफेक केली जात होती. त्यामुळे या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल अपेक्षित असताना, न्यायालयाने तपास यंत्रणेवरच मोठा निर्णय घेतला. हे संपूर्ण प्रकरण सीबीआयच्या स्वाधीन करण्याचे निर्देश देतानाच, तपासाच्या नावाखाली कोणावरही विनाकारण आरोप ठेवता येणार नाहीत किंवा कोणालाही आरोपी मानून कारवाई करता येणार नाही, हे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. या आदेशामुळे राजकीय आरोपांच्या घेऱ्यात असलेल्या आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला असून, आता या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयच्या माध्यमातून निष्पक्षपणे होणार आहे. दिशाच्या वडिलांनी आपल्या मुलील न्याय मिळावा याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली आहे.








