MIDC will stop the migration of unemployed people : आमदार कुटे म्हणाले, ‘जळगाव जामोदमध्ये एमआयडीसी आवश्यकता’
Khamgao ग्रामीण भागातील बेरोजगारी आणि त्यानुषंगाने होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर ही गंभीर समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी उभारावी, अशी मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आ. डॉ. कुटे यांनी ग्रामीण भागात उद्योग धोरण विकसित करण्याची गरज व्यक्त केली. पुणे, मुंबई, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.
जळगाव जामोद मतदारसंघ सिंचनाच्या दृष्टीने समृद्ध होत आहे. त्यामुळे येथे औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी पोषक वातावरण आहे. मात्र, अद्यापही या भागात उद्योग व्यवसायाची कमतरता आहे. आदिवासीबहुल भाग असलेल्या या मतदारसंघात रोजगार निर्मिती होण्यासाठी औद्योगिक वसाहत उभारणे आवश्यक आहे. शासनाने ग्रामीण भागातील उद्योग उभारणीसाठी समिती स्थापन करून अभ्यास करावा आणि मतदारसंघानुसार उद्योग धोरण राबवावे, अशीही मागणी त्यांनी केली.
ग्रामीण भागात उद्योग व व्यवसाय वाढल्यास सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या गावातच रोजगार मिळेल. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांत होणारे स्थलांतर रोखता येईल. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून जळगाव जामोद मतदारसंघात एमआयडीसी उभारावी, अशी भूमिका डॉ. संजय कुटे यांनी मांडली.