डॉ. राजपूत गहिवरले म्हणाले, सुधीरभाऊंचे प्रयत्न दुःखी कुटुंबांसाठी आधार ठरले !

Dr. Sunil Rajput said emotionally, “Sudhir Bhau’s efforts became a support for the grieving families.”वैनगंगा दुर्घटनेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत मिळाल्यानंतर डॉ. सुनील राजपूत यांची भावनिक प्रतिक्रिया

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळाल्यानंतर संबंधित कुटुंबांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. या मदतीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सुनील बाबूलाल राजपूत यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दुःखाच्या काळात कोणी तरी आपली वेदना समजून घेत आहे, ही भावना त्या कुटुंबांना मोठा आधार देणारी ठरली आहे.

१० मे २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेत बुलढाणा येथील गोपाल गणेश साखरे आणि छत्रपती संभाजीनगर येथील स्वप्निल उद्धवसिंह शिरे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला होता आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी क्षण त्यांनी अनुभवले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे विनंती करून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

Katol blast : काटोल स्फोटातील जखमी झालेली आणखी एक कामगार महिला दगावली, एकूण मृतांची संख्या झाली २०

या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने ४ मार्च २०२६ रोजी आदेश जारी करून गोपाल साखरे आणि स्वप्निल शिरे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली. या निर्णयामुळे दुःखाने खचलेल्या कुटुंबांना काही प्रमाणात आर्थिक आधार मिळाला आहे.

या मदतीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. सुनील बाबूलाल राजपूत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, खूप खूप धन्यवाद… सुधीरभाऊ आणि आपले प्रयत्न या दुःखी जीवन असलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी कामी आले. साखरे कुटुंब आणि शिरे कुटुंब यांच्या वेदना समजून आपण केलेले प्रयत्न खरेच कौतुकास्पद आहे.त्यांच्या दुःखाच्या काळात मिळालेली ही मदत फुलाच्या पाकळीप्रमाणे असली तरी ती त्यांच्या विस्कळीत झालेल्या आयुष्यातील मोठा दिलासा ठरली आहे.

डॉ. राजपूत यांनी पुढे सांगितले की, आपल्या मुलांना गमावलेल्या कुटुंबांसाठी कोणतीही मदत त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकत नाही, मात्र अशा वेळी शासनाकडून मिळणारा आधार त्यांच्या जीवनाला उभारी देणारा ठरतो. या मदतीमुळे आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या कुटुंबांना थोडासा आधार मिळाला असून ही संवेदनशीलता आयुष्यभर लक्षात राहील, असेही त्यांनी नमूद केले. अशा कठीण प्रसंगी कुणीतरी हात पुढे करणे, हीच माणुसकीची खरी ओळख असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Vijay Wadettiwar : आज लग्न लावले, अपत्य २०४७ मध्ये होईल; अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची उपरोधिक टीका

या निर्णयानंतर दोन्ही कुटुंबीयांनीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशीलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून कठीण प्रसंगी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही मदत शक्य झाल्याची भावना व्यक्त केली आहे. दुःखाच्या छायेत असलेल्या या कुटुंबांसाठी शासनाने दिलेला हा आधार त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्प्यातील एक महत्त्वाचा दिलासा ठरत असल्याची भावना स्थानिक स्तरावरही व्यक्त होत आहे. अशा प्रसंगी मिळालेला हा आधार त्यांच्या आयुष्यात माणुसकीची उब देणारा क्षण ठरत असल्याचेही अनेकांनी नमूद केले.