Clarified, Even if you add up all of them, its still less than Shiv Sena alone : स्पष्ट केले ‘सगळ्यांची बेरीज केली तरी एकट्या शिवसेनेपेक्षा कमी
Mumbai: महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीला सलग पराभवाचा सामना करावा लागला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालांनंतर थेट उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘खरी शिवसेना कोणती हे मतदारांनी दाखवून दिलं आहे,’ असं म्हणत शिंदे यांनी मविआच्या पराभवावर बोट ठेवलं.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि २० तारखेला राज्यातील विविध भागांत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाले असून, महायुतीच्या पारड्यात मोठं यश पडलं आहे. एकूण २८७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी महायुतीचे २१५ नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
Local body elections : जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक विजयी; दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस
महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपचे ११९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ६० तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३६ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. दुसरीकडे, मविआमध्ये काँग्रेसला ३२, शिवसेना ठाकरे गटाला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला केवळ ८ नगराध्यक्ष पदं मिळाली आहेत.
या विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. ‘एवढं मोठं यश शिवसेनेला मिळालं आहे, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो,’ असं ते म्हणाले. शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं नमूद करत त्यांनी पुन्हा ‘खरी शिवसेना’ कोणती, हे मतदारांनी स्पष्ट केल्याचा दावा केला.
मविआमधील अपयश आणि ठाकरे गटाच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता, एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात खोचक टोला लगावला. ‘महाविकास आघाडीतील सगळ्यांची बेरीज केली, तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे,’ असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला डिवचलं. खरी शिवसेना कोणाची हे मतदारांनी या निवडणुकीत दाखवून दिल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, खरी शिवसेना ही शिवसैनिकांची आहे, महाराष्ट्रातील जनतेची आहे. काही लोकांना शिवसेना आपली मक्तेदारी वाटत होती, मालक-नोकर अशी मानसिकता होती, पण शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही, इथे सगळे कार्यकर्ते आहेत, म्हणूनच आम्हाला एवढं चांगलं यश मिळालं आहे, असं त्यांनी सांगितलं.
Ramdas tadas, Amar kale: भाजपच्या आजी-माजी खासदारांची मेहनत व्यर्थ, नगरपरिषद गमावली
निवडणूक आयोग, न्यायालय आणि इतर संस्थांवर करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, काही लोक निवडणूक आयोगावर बोलत होते, कोर्टावर आरोप करत होते. पण आम्हाला विश्वास होता की जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल. आज जनतेच्या न्यायालयाने कौल दिला आहे. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी दाखवून दिलं आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना थेट सुनावलं.
एकूणच, नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांनी महायुतीचा आत्मविश्वास वाढवला असून, शिंदे गटासाठी हे निकाल राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरले आहेत. आगामी काळातील जिल्हा परिषद आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हे निकाल महत्त्वाचे संकेत देणारे मानले जात आहेत.








