व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Eknath Shinde : जनतेच्या न्यायालयाने उत्तर दिले, शिवसेना आमचीच; सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादावर...

Eknath Shinde : जनतेच्या न्यायालयाने उत्तर दिले, शिवसेना आमचीच; सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

People’s court has already given its verdict; Eknath Shinde responds to the arguments made in the Supreme Court : उद्धव ठाकरे गटाकडून जुनेच मुद्दे न्यायालयात मांडले जात असल्याची टीका

Mumbai सर्वोच्च न्यायालयात ‘शिवसेना कुणाची’ यावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून उद्धव सेनेकडून तेच तेच जुने मुद्दे न्यायालयात मांडले जात आहेत. मात्र, जनतेच्या न्यायालयाने शिवसेना नेमकी कोणाची याचे स्पष्ट उत्तर दिले असून, शिवसेना आमचीच आहे, असा ठाम दावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

आपल्या दाव्याचे समर्थन करताना शिंदे म्हणाले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले. त्यानंतर पार पडलेल्या महापालिका आणि नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेने ‘धनुष्यबाण’ चिन्हाला भरभरून मतदान केले आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. जनतेने दिलेला हा कौलच शिवसेना आमची असल्याचे भक्कम आणि जिवंत प्रमाण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Shivsena supreme court hearing: एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाकडून मुख्यमंत्री झाले? धनुष्यबाण उद्धव सेनेला द्या किंवा गोठवा

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी “एकनाथ शिंदे नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाकडून मुख्यमंत्री झाले?” असा सवाल उपस्थित करत युक्तिवाद केला होता. विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष वेगळा असतो, असा दावा करत त्यांनी विधान सभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह उद्धव ठाकरेंना द्या किंवा गोठवा, अशी मागणी केली. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही धनुष्यबाणावर आपलाच हक्क असल्याचे सांगितले.

दुसरीकडे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटाच्या दाव्यांवर भाष्य करताना सांगितले की, न्यायालयात सध्या केवळ एकाच बाजूचा युक्तिवाद सुरू आहे. शिंदे सेनेच्यावतीने आमची भक्कम बाजू मांडायची अजून बाकी आहे. आमचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा, यावर योग्य आणि न्याय्य निर्णय होईल.

error: Content is protected !!