Breaking

Eknath Shinde : शिंदे सेनेच्या नेत्याचा जलसमाधीचा इशारा!

 

Shinde Shivsena leader warns of drowning : अवैध रेती वाहतुकीविरोधात संतोष भुतेकर यांचे आंदोलन

Buldhana उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे DCM Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सत्तेतील एक महत्त्वाचा घटक असूनही, पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रशासनातील अधिकारी जुमानायला तयार नाहीत, अशी टीका सध्या होऊ लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार असून ते केंद्रीय मंत्रीही आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सातपैकी सहा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत आणि शिंदे गटाचा एक आमदारही जिल्ह्यात आहे. एवढे सत्ताधारी असूनही अधिकाऱ्यांवर पक्षाचा वचक का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, या आंदोलने फक्त वर्तमानपत्रांपुरती मर्यादित राहत असून, प्रत्यक्षात कारवाईचे कोणतेही ठोस परिणाम दिसून येत नाहीत. अवैध रेती वाहतूक पूर्ववत सुरूच असल्यामुळे भुतेकर यांनी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे कुणाच्या उसन्या खांद्यावर झालेले नेते नाहीत !

“अधिकारी ऐकायला तयार नसतील, तर मी थेट खडकपूर्णा प्रकल्पात जलसमाधी घेतो,” असा इशारा भुतेकर यांनी दिला असून याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा प्रशासनावर वचक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खडकपूर्णा प्रकल्पातून देऊळगावराजा, बुलडाणा, सिंदखेडराजा शहरांसह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या प्रकल्पातून दररोज कोट्यवधी रुपयांची गौण खनिज चोरी होत असल्याचा आरोप संतोष भुतेकर यांनी केला आहे. दररोज रात्री ३०० ते ३५० टिप्पर गाड्यांद्वारे अवैध रेती वाहतूक केली जाते. महसूल व पोलीस प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
भुतेकर यांचा लढा नवीन नाही. ते अनेक दिवसांपासून अवैध रेती वाहतुकीविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ नावालाच कारवाई केली जाते. त्यामुळे “रेती उपसा अधिकृत करा किंवा अनधिकृत उपसा तात्काळ बंद करा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

Eknath Shinde Shivsena : कुणाल कामरावर फक्त गुन्हा नको, अटक करा!

याशिवाय, अवैध रेती उपसा व वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही आग्रही मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या मागण्यांकडे सकारात्मक दखल न घेतल्यास, येत्या २२ एप्रिल रोजी संतोष भुतेकर खडकपूर्णा प्रकल्पात जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.