Eknath Shinde Shivsena : शिंदेसेनेत ‘जुने विरूद्ध नवे’ संघर्ष पेटणार? खामगाव-शेगावात निष्ठावंतांची कोंडी

shinde-sena-internal-rift-khamgaon-shegaon-loyalists-vs-newcomers : प्रतापराव जाधवांच्या ‘नव्या’ रणनीतीमुळे जुने पदाधिकारी बॅकफूटवर; संघटन वाढीच्या नावाखाली निष्ठावंतांना डच्चू देण्याची चर्चा

Khamgao बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या खामगाव आणि शेगाव तालुक्यात शिंदेसेनेतील (शिवसेना – शिंदे गट) अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पक्षात जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून ‘नव्या दमाच्या’ नेतृत्वाचा उदय होत असल्याचे चित्र आहे. या बदलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये दोन तट पडले असून, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंतांमध्ये तीव्र संताप आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व घडामोडींना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे थेट पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा आहे. पक्षविस्ताराच्या नावाखाली नव्या चेहऱ्यांना पुढे करून जुन्या फळीतील नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे.

Zilla Parishad elections : ‘गाव तिथे शाखा, घर तिथे युवा शिवसैनिक’; डोणगावात युवा सेनेचा गावभेट दौरा

शिंदेसेनेतील या बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती आगामी निवडणुकीत पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते. नवीन पदाधिकाऱ्यांकडे सध्या सूत्रे गेल्याने संघटनात्मक हालचाली वाढल्या आहेत. मात्र, या घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमध्ये जुन्या अनुभवी नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप होत आहे. संकटाच्या काळात पक्षाचा भगवा टिकवून धरलेले जुने पदाधिकारी सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. बदलत्या समीकरणात आपले अस्तित्वच धोक्यात आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली असून, ही शांतता एखाद्या मोठ्या राजकीय स्फोटाची नांदी ठरू शकते.

खामगाव-शेगाव पट्ट्यात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रतापराव जाधव यांनी ही नवी फळी तयार केल्याचे बोलले जात आहे. मात्र, जुन्या फळीला डावलून नवी संघटना किती यशस्वी होईल, यावर राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. समन्वय आणि विश्वासाचा अभाव राहिल्यास याचा थेट फायदा विरोधकांना मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Khamgao Municipal Council : खामगाव पालिका सभेत विरोधकांची धार बोथट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोणत्याही पक्षात संघटन वाढवणे आवश्यक असले तरी, खामगाव आणि शेगावमध्ये सध्या जाणवणारा हा सूक्ष्म तणाव आणि उघडपणे दिसणारी गटबाजी यामुळे शिंदेसेनेचे ‘मिशन २०२६’ धोक्यात येऊ शकते. पक्षाचे अधिकृत नेते सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले, तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील दुरावा वाढतच चालला आहे.