eknath-shinde-kiran-pandav-obc-mahasangh-national-conference-bengaluru-special-message : निकटवर्तीय बंगळुरूतील ओबीसी महाअधिवेशनात, मुख्यमंत्र्यांचाही खास संदेश
Mumbai:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अकराव्या राष्ट्रीय महाअधिवेशनात एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे विदर्भातील प्रमुख नेते किरण पांडव सहभागी झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
बंगळुरूमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अकरावे राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडत असून, या अधिवेशनात ओबीसी समाजाच्या विविध मागण्या, आरक्षणाचे प्रश्न आणि भविष्यातील भूमिका यावर सखोल चर्चा होणार आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेले असताना या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Teacher Recruitment : राज्यात शिक्षक भरतीचा बिगुल; ३०,२०९ पदांची मेगा भरती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच किरण पांडव यांना या अधिवेशनासाठी बंगळुरूला पाठवले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरपारच्या लढाईचा इशारा दिल्यानंतर ओबीसी नेते पुढील रणनीती ठरवण्यासाठी या अधिवेशनात एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या प्रतिनिधीची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसले तरी त्यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या आहेत. जातीय जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आपल्या संदेशातून दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच अधिवेशनात मंजूर होणाऱ्या ठरावांबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Raj Thackeray : कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार का? प्रत्येकाला फक्त कमिशनची चिंता
या महाअधिवेशनात ओबीसी समाजाच्या सुमारे २८ प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार असून, त्यासंदर्भातील ठराव मांडले जाणार आहेत. याशिवाय, बोगस ओबीसी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरही व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. अलीकडेच काही लोकप्रतिनिधींच्या ओबीसी प्रमाणपत्रांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यभर विशेष मोहीम राबविण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख ओबीसी नेते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या बैठकीतून कोणती भूमिका समोर येते आणि राज्यातील ओबीसी राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.








