eknath-shinde-shiv-sena-meeting-warning-no-work-no-post-pune-committee-dismissed : ऑनलाईन बैठकीत पक्षाला कडक शिस्तीचा डोस
Mumbai: उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश देत “काम नाही तर पदही नाही” असा थेट इशारा दिला आहे. नवनियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुखांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत शिंदे यांनी कामगिरीवर भर देत पक्ष संघटनेत शिस्त आणि उत्तरदायित्व वाढवण्यावर जोर दिला.
या बैठकीत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत मंत्री, आमदार आणि खासदार अशी सर्व पदे बाजूला ठेवून कार्यकर्त्यांप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले. पक्षाच्या वाढीसाठी जमिनीवर काम करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक नेत्याने आपल्या मतदारसंघात सक्रिय राहून संघटन मजबूत करण्याचे निर्देश दिले. कामाचा कोणताही ठोस अहवाल मिळाला नाही तर संबंधित पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पुणे येथील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राज्यातील इतर पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की निष्क्रियता सहन केली जाणार नाही. या कारवाईमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
Israel lebanon attack : इस्रायलचे लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले, २५४ नागरिकांचा मृत्यू
बैठकीदरम्यान शिंदे यांनी प्रत्येक संपर्क प्रमुखाला त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा सादर करण्यास सांगितले. लोकसभा संपर्क प्रमुखांनी एकत्रित बैठका घेण्याऐवजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र बैठक घ्यावी, त्या बैठकींचे फोटो आणि अहवाल दररोज सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक मतदार यादीवर किमान दोन बीएलए नेमून त्यांच्यासोबत नियमित संपर्क ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
शिंदे यांनी नेमणुकीपासून आतापर्यंतच्या कामगिरीबाबत वैयक्तिक पातळीवर विचारणा करत किती बीएलए नेमले, किती बैठका घेतल्या आणि मतदारसंघात किती वेळा भेटी दिल्या याची माहिती मागवली. कामाचा आढावा समाधानकारक नसल्यास “आता बघून घेणार नाही, थेट नारळ दिला जाईल” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, अलीकडील निवडणुकांमधील कामगिरीवरून पक्षातील काही मंत्र्यांवर शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्यामुळे तसेच जिल्हा परिषद निवडणुकांतील निकाल लक्षात घेता संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान फेरबदलाचे संकेत देण्यात आले होते, मात्र त्यावेळी पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.
आता मात्र शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटात लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून, कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांवर कामगिरीचे दडपण वाढले आहे.








