Election campaign : मोबाईलच्या स्क्रीनवर उडतोय प्रचाराचा धुरळा !

The dust of propaganda is flying on the mobile screen : पोस्टर्स-भोंग्यांच्या जमान्यातून सोशल मिडियाच्या युगात झेप; मात्र हायटेक प्रचाराने मतांची दिशा बदलणार ?

Nagpur : निवडणुकीचा हंगाम जवळ आला की रस्ते, चौक, भिंती, रिक्षा आणि सभागृहांवर राजकीय रंग चढतो, असा पूर्वीचा अनुभव. चुना, गेरूने रंगवलेल्या भिंती, मोठमोठे पोस्टर्स, बिल्ले, पॉम्पलेट्स, भोंगे लावलेली रिक्ष, या सर्व माध्यमांतून पक्ष आपली ताकद दाखवायचे. पण आता चित्र मोठ्या वेगाने बदलले आहे. राजकीय प्रचाराचा केंद्रबिंदू थेट मोबाईलच्या स्क्रीनवर पोहोचला आहे.

आज जवळपास सर्वच पक्षांनी आपली रणनिती डिजिटल प्लॅटफॉर्म्सकडे वळवली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर (X), व्हॉट्सअ‍ॅप प्रचाराची मुख्य रणभूमी हीच बनली आहे. राजकीय पक्ष आता निर्बंधांशिवाय थेट मतदारांशी संवाद साधू शकतात, ताबडतोब प्रतिक्रिया मागवू शकतात, सर्वेक्षणे घेऊ शकतात आणि दिशानिर्देशही करू शकतात. हायटेक व्हिडिओ, रील्स, इन्फोग्राफिक्स, व्हॉट्सअ‍ॅप कॅम्पेन, बॉट आधारित संभाषणे, मायक्रो टार्गेटिंग राजकीय पक्षांकडून प्रचार अधिकाधिक वैयक्तिक पातळीवर पोहोचवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.

Local Body Elections : ‘बंडखोरी’चा स्फोट : सर्वच पक्षांमध्ये अंतर्गत कलहाने ढवळून निघाले निवडणुकीचे गणित !

मतदार कुणाला कौल देणार?
या डिजिटल कॅम्पेनने जनतेचे लक्ष निश्चितच वेधले आहे. परंतु, या हायटेक स्पर्धेत अंतिम कौल मतदार कुणाला देतील, हे जाणून घेणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. प्रचाराचे आकर्षक फंडे, भडक व्हिडिओ किंवा ऑनलाइन लाईव्ह सभा, हे सर्व मतदारांच्या मोबाईलवर दिसत असले तरी निर्णय मात्र तर्कशुद्ध आधारावरच होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सोशल मिडिया प्रचाराचा मतदानावर प्रभाव?
आश्चर्य म्हणजे जिथे संपूर्ण प्रचार डिजिटलवर अवलंबून आहे, तिथे सोशल मिडियावरील प्रचाराचा प्रत्यक्ष मतदानावर थेट परिणाम होणार नाही, असा राजकीय विश्लेषकांचा विश्वास आहे. कारण ग्रामीण भागातील मोठा मतदारवर्ग अद्याप प्रत्यक्ष अनुभव, स्थानिक नेतृत्व, विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टींना प्राधान्य देतो. मोबाईलवरील प्रचार एक पूरक साधन असले तरी निर्णय घेण्याची मानसिकता अजूनही पारंपरिक मुद्द्यांवरच आधारलेली आहे.

Municipal Corporation Elections : महाविकास आघाडीत ‘मनसे’वरून कोंडी; काँग्रेसचा विरोध, तर पवारांची तयारी !

मतदारांचे लक्ष विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रीत..
या हायटेक रणधुमाळीतही मतदारांची नजर एकाच गोष्टीवर टिकून आहे. विकासाचा दृष्टीकोन. रस्ते, पाणी, रोजगार, महागाई, सुविधा, स्थानिक प्रश्न, हेच मतदारांच्या मनातले खरे मुद्दे आहेत. प्रचाराचे माध्यम बदलले, पद्धती बदलल्या, पण मतदारांची अपेक्षा मात्र बदललेली नाही. मोबाईलच्या स्क्रीनवर धुरळा उडत असला तरी खरी लढत जमिनीवरील विकासाच्या प्रश्नांवरच होणार, हेच या परिस्थितीतून स्पष्ट दिसते आहे.