Election Commission : शिक्षक मतदारसंघाच्या यादीत घुसवले बोगस मतदार!

Bogus voters inserted into the teachers’ constituency list : पडताळणीत उघडकीस; प्राचार्यांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत शिक्षक नसलेले दोन बोगस मतदार घुसवल्याचा धक्कादायक प्रकार वरुड तहसील कार्यालयात उघड झाला आहे. याप्रकरणी नायब तहसीलदार (निवडणूक) अरुण रामचंद्र पाटणे (वय ५७) यांनी वरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हातुर्णा (ता. वरुड) येथील स्व. पंजाबराव ठाकरे कृषी तंत्र विद्यालयातील वर्ग-चार कर्मचारी विशाल राजकुमार ठाकरे, शिक्षकेतर कर्मचारी रुपराव सदाशिव पेठे आणि संबंधित प्राचार्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वरुड तहसील कार्यालयात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनर्विलोकन सुरू आहे. या मतदारसंघात केवळ शिक्षकच मतदार असतात. याच पार्श्वभूमीवर नावांची पडताळणी करताना नायब तहसीलदार पाटणे यांनी मतदार म्हणून नोंदवलेल्या दोन जणांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यावेळी दोघांनीही आपण शाळेत चपराशी व शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्या दोघांची ‘शिक्षक’ या नात्याने केलेली नोंद बोगस असल्याचे समोर आले.

Ajit Pawar : कापूस खरेदीतील तक्रारींचा आचारसंहितेनंतर निर्णय

या दोन्ही कर्मचाऱ्यांनी कधीही अध्यापनाचे काम केले नसतानाही त्यांना शिक्षक म्हणून दाखविण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे खोटे प्रमाणपत्र विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या छाननीदरम्यान हा प्रकार प्रथम उघडकीस आला. त्यानंतर पाटणे यांनी ही बाब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना कळवली. वरिष्ठांच्या निर्देशानुसार २५ नोव्हेंबर रोजी रात्री या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नायब तहसीलदार अरुण पाटणे म्हणाले, “संबंधित प्राचार्याने दोन्ही कर्मचाऱ्यांबाबत ते शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले. परिणामी, मतदार यादीमध्ये त्यांची नोंद करण्यात आली. छाननीअंती हा शासकीय फसवणुकीचा प्रकार उघड झाला.”

Devendra Fadnavis : ‘देवेंद्र…!’ भरसभेत महिलेने हाक मारली, सारेच गोंधळले

या प्रकरणामुळे शिक्षक मतदारसंघाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून पुढील कारवाईची मागणी होत आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व किरण सरनाईक करीत आहे. गत निवडणुकीत त्यांचे साडी व पाकिट प्रकरण चांगलेच गाजले होते. ते सध्या शिवसेना शिंदे गटात आहे.