Election Result : पुण्यात काका–पुतण्याची एकी अपयशी ठरली; भाजपची मोठी मुसंडी,

Ajit Pawar leads in 7 seats while Sharad Pawar leads in only 3 seats. : अजित पवारांना 7 तर शरद पवारांना केवळ 3 जागांवर आघाडी

Pune : निवडणुकीच्या तोंडावर काका–पुतण्याची राष्ट्रवादी एकत्र आणून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले, मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निकालांनी अजित पवार आणि शरद पवार या दोघांनाही जबरदस्त झटका दिला आहे. प्रचारात आक्रमक भूमिका, मोठे मेळावे आणि एकीचा गाजावाजा करूनही प्रत्यक्ष निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. उलट भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्पष्ट आघाडी घेत आपली सत्ता कायम राखण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी झालेल्या लढतीत भाजपने 74 जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता कायम राहण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी आघाडीला केवळ 41 जागांवर समाधान मानावे लागत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. काका – पुतण्याच्या एकीचा फारसा फायदा झालेला नसल्याचे या निकालांवरून दिसून येत आहे.

Election results : मुंबईत काँग्रेसचा पहिला धक्का देणारा विजय, मलिक कुटुंबाला हादरा

पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीतही भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपने तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली असून महापालिकेत एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पुणे महापालिकेत बहुमतासाठी 82 जागांची आवश्यकता असून भाजप हा टप्पा सहज पार करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मोठ्या अपेक्षा असूनही मर्यादित यशावर समाधान मानावे लागले आहे. सध्याच्या स्थितीत अजित पवार गटाला केवळ 7 तर शरद पवार गटाला अवघ्या 3 जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे.

BMC elections : भाजपचे बहुचर्चित उमेदवार नवनाथ बन विजयी

दरम्यान, राष्ट्रवादीतील एकीला उघडपणे विरोध करत शरद पवार गटातून काँग्रेसमध्ये गेलेले प्रशांत जगताप यांनी पुण्यात महत्त्वाचा विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 18 ड मधून प्रशांत जगताप यांनी अटीतटीच्या लढतीत विजय खेचून आणत काँग्रेसचे खाते उघडले आहे. भाजपकडून निवडणूक लढवणारे अभिजीत शिवरकर यांचा जगताप यांनी पराभव केला आहे. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र असून ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. प्रशांत जगताप यांनी सुमारे 1800 मतांनी विजय मिळवला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप या पिछाडीवर असल्याची माहिती आहे.

एकूणच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचे निकाल पाहता भाजपची ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर काका–पुतण्याची एकी करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने आगामी राजकारणात या निकालांचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

___