Election results 2026 : मुंबईसह राज्यातील महापालिकांवर भाजपचा झेंडा

Big blow to Thackeray power equations changed across : ठाकरेंना मोठा धक्का, राज्यभर सत्ता-समीकरणे बदलली

Mumbai : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई महापालिकेपासून नागपूर, पुणे, सोलापूरपर्यंत भाजपने जोरदार कामगिरी करत अनेक ठिकाणी सत्ता मिळवली असून काही पारंपरिक बालेकिल्ले विरोधकांच्या हातातून निसटताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेच्या निकालांनी सर्वाधिक लक्ष वेधले असून, यावेळी मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. भाजपचे 86 उमेदवार विजयी झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 71 जागा, शिवसेना शिंदे गटाला 29 जागा तर काँग्रेसला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या ठाकरे गटाच्या हातून मुंबई निसटली असून हा त्यांच्या दृष्टीने मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब म्हणजे चंद्रपूर आणि परभणी या दोन महानगरपालिकांमध्ये त्यांची कामगिरी ठीक राहिली आहे.

Election Result : पुण्यात काका–पुतण्याची एकी अपयशी ठरली; भाजपची मोठी मुसंडी,

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये भाजपने वर्चस्व राखत एकहाती सत्ता मिळवली आहे. 151 जागांच्या नागपूर महानगरपालिकेत भाजपने 102 जागांवर विजय मिळवला असून काँग्रेस 37 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवसेना शिंदे गटाला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक, शिवसेना ठाकरे गटाला एक तर बसपाने चार जागा मिळवल्या आहेत. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाचा करिष्मा पुन्हा एकदा दिसून आल्याचे या निकालांमधून स्पष्ट झाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. पुणे महापालिकेत भाजप सर्वाधिक 52 जागांवर आघाडीवर असून अजित पवार गटाला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने 74 जागांवर आघाडी घेत सत्ता कायम राखली आहे, तर अजित पवार गटाचे 40 उमेदवार आघाडीवर आहेत. या निकालांमुळे पुणे परिसरात राष्ट्रवादीची पकड सैल झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Election results : मुंबईत काँग्रेसचा पहिला धक्का देणारा विजय, मलिक कुटुंबाला हादरा

राज्यातील एकूण निकालांचा आढावा घेतला असता भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. आतापर्यंत भाजपचे सुमारे 920 उमेदवार विजयी झाले असून शिवसेनेचे 237, काँग्रेसचे 172, शिवसेना ठाकरे गटाचे 124, अजित पवार गटाचे 110, एमआयएमचे 41, वंचित बहुजन आघाडीचे 18, शरद पवार गटाचे 18, मनसेचे 11 तर इतर पक्ष आणि अपक्षांचे 144 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसनेही राज्यभरात चांगली कामगिरी करत सेंचुरी पार केली असून अनेक ठिकाणी भाजपला टक्कर दिली आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले असून येथे ना भाजप, ना शिवसेना, ना काँग्रेस, तर बहुजन विकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. बविआचे 65 उमेदवार आघाडीवर असून भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे. लातूर महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 20 जागांवर आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे.

BMC elections : भाजपचे बहुचर्चित उमेदवार नवनाथ बन विजयी

सोलापूरमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठत सत्ता मिळवली असून पालकमंत्री जयकुमार गोरे जल्लोषासाठी सोलापूरकडे रवाना झाले आहेत. जळगाव महापालिकेत प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले असून यामध्ये माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन यांचा समावेश आहे.
एकूणच 2026 च्या महापालिका निवडणुकांच्या निकालांनी राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली असून भाजपचा दबदबा वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर, नागपूर-पुण्यात मजबूत सत्ता आणि राज्यभरातील आघाडी यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

___