Congress state president Harshvardhan Sapkal’s freezing of Panja symbol in Butibori creates discussion across the state : स्थानिक नेत्यांना डावलून निर्णय घेतल्याचा आरोप, बुटीबोरीत पंजा चिन्ह गोठवल्याने राज्यभर चर्चा
Butibori – Nagpur : काँग्रेस पक्षात तिकीट वाटपापासून स्थानिक नेतृत्वाच्या मानमरातबापर्यंत अनेक असंतोष नेहमीच चव्हाट्यावर येत असतात. आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका निर्णयाने राज्यभरात नवा राजकीय वाद निर्माण केला आहे. नागपूरलगतच्या बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसने स्वतःचे अधिकृत उमेदवार न देता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरकार्यवाह सुमीत मेंढे यांना नगराध्यक्षपदासाठी खुला पाठिंबा दिल्याचे उघड झाले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘पंजा’ हे अधिकृत निवडणूक चिन्हच गोठवून, काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्वतंत्र लढण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट तक्रारी केल्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्षच झाल्याचा आरोप त्याच नेत्यांकडून होत आहे.
Local body election : भाजपचे अजितदादांच्या ‘होमग्राउंड’वर मोठे जाळं;
सपकाळांचा गांधीवादी- संघविरोधी ठसा धुळीस..
हर्षवर्धन सपकाळ हे स्वभावतः गांधीवादी विचारांचे आणि संघविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. अशातच त्यांनी बुटीबोरीत एका स्वयंसेवकाला काँग्रेसकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देणे ही मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे. काँग्रेसने संघाशी विचारसरणीने विसंगत असलेल्या स्थानावरून आतापर्यंत अनेक मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली आहे. परंतु सपकाळांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेस संघाच्या दावणीला बांधली गेली का, असा सवाल आता थेट पक्षातच उपस्थित होत आहे.
स्थानिक नेत्यांना डावलले..
टीकाकारांचे म्हणणे स्पष्ट आहे की, प्रदेशाध्यक्षांनी हे सर्व निर्णय स्थानिक नेत्यांचे मत न विचारता घेतले. तिकीट वाटपात आणि स्थानिक नेतृत्वात त्यांची पकड राहिली नाही का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बुटीबोरीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित केले गेले, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
निवडणूक आधी संपुर्ण धूर आटोपूद्या, मग पाहू..
सपकाळ यांची सध्याची भूमिकादेखील वाद वाढवणारी आहे. तक्रारींच्या ढिगाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते सध्या आधी निवडणूक होऊ द्या, नंतर सगळं बघू, अशीच भूमिका घेत असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील काँग्रेस संघटनेत आधीच आघाडीच्या रचनेपासून स्थानिक बंडखोरीपर्यंत असंतोष वाढलेला असताना, या नव्या वादामुळे मोठे राजकीय वादंग उठले आहे.
यामुळे फक्त बुटीबोरीच नव्हे तर संपूर्ण काँग्रेस राज्यभर गाजणाऱ्या ‘सपकाळ प्रकरणा’च्या चर्चेत अडकली आहे. पक्षाची प्रतिमा, संघटनशक्ती आणि नेतृत्वावर विश्वास, या तीनही पातळ्यांवर या घटनेचा मोठा परिणाम होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.








