Demand for water for agriculture from the left canal of Khadakpurna Dam : खडकपूर्णातून शेतीसाठी पाण्याच्या मागणीला जोर, अंत्यसंस्काराला राजकीय पुढारी, शेतकरी नेते
Buldhana खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढा देण्यात आला. पण शासन आणि प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर युवा शेतकरी कैलास नागरे (शिवनी अरमाळ) यांनी आत्महत्या केली. स्थानिक शेतकरी या आत्महत्येला बलिदान म्हणत आहेत. शेतकऱ्याने आत्महत्या करेपर्यंत सरकार आणि प्रशासन का अंत बघते, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
होळीच्याच दिवशी सकाळी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. नागरे यांच्या पार्थिवावर दुपारी पाचच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. होळीच्या दिवशीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे शिवनी अरमाळसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. गावात कोणत्याही घरात सणावाराच्या गोडधोडाचा गंध नव्हता. अनेकांना अश्रु अनावर झाले.
Mahayuti Governmemt : आरोग्य व्यवस्थेत बुलढाणा जिल्हा मागास!
शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रकाश गीते, दादाभाऊ खारडे, भगवानराव मुंढे, अॅड. शर्वरी तुपकर, विनायकराव सरनाईक यांसारख्या मान्यवरांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली. ‘ही आत्महत्या नसून शासनाच्या नाकर्तेपणामुळे घडलेला एक नियोजित खून आहे. प्रशासन आणि भाजप-महायुती सरकारने घेतलेला हा शेतकऱ्याचा बळी आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली आहे.
खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडणारे सरकार शेतकरीविरोधी आहे. कैलास नागरे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावा. त्यांना अटक केलीच पाहिजे. आम्ही हा लढा पूर्ण ताकदीने पुढे नेऊ, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेली, तरी शेतकऱ्यांना आपल्या हक्कांसाठी प्राण द्यावे लागत असल्याचे हे विदारक सत्य आहे. नागरे यांच्या आत्महत्येने महाराष्ट्राच्या कृषी धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे सरकारने वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे. कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी लढा उभारण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे.