February forecast : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट;रब्बी पिकांवर संकटाची छाया

unseasonal-rain-alert-nagpur-bhandara-gondia-ratnagiri-rabi-crops-damage : नागपूर, भंडारा, गोंदिया ते रत्नागिरीपर्यंत जोरदार सरी

Mumbai: महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. विशेषतः विदर्भ आणि कोकण पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या तर काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.

नागपूर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने काही भागांत झाडे उन्मळून पडली. मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

भंडारा जिल्ह्यात पहाटेपासूनच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यांसोबत झालेल्या या पावसामुळे काढणीच्या टप्प्यात असलेल्या चना, तूर, मुग, उडीद यांसारख्या कडधान्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांनाही या पावसाचा परिणाम होऊ शकतो. मात्र उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस काही प्रमाणात लाभदायक ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

State Cooperative Election Authority (SCEA) : अकोल्याच्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचे वारे, दिग्गज नेते नशीब आजमावणार

गोंदिया जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली. गोरेगाव, देवरी आणि सालेकसा तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. काही ठिकाणी विजांचा कडकडाटही ऐकू आला. रब्बी हंगामातील धान पिकाला या पावसाचा फायदा होण्याची शक्यता असली तरी कडधान्य आणि बागायती पिकांसाठी मात्र ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

दरम्यान, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातही अवकाळी पावसाने आंबा उत्पादकांची धास्ती वाढवली आहे. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या आंबा बागांवर या पावसाचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी फळबागांवर त्याचा काय परिणाम होईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लातूर शहर आणि परिसरातही मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत वेगवेगळ्या वेळेला पावसाच्या सरी कोसळल्या. राजीव गांधी चौक, उद्योग भवन आणि गरुड चौक परिसरात सकाळी जोरदार पाऊस झाल्याने काही काळ रस्त्यांवर पाणी साचले. मात्र या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

Youth Congress : मेळघाटात युवक काँग्रेसची ‘मनरेगा बचाव यात्रा’

हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यांसोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अवकाळी पावसाच्या या सत्रामुळे विदर्भ आणि कोकणातील शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले असून पुढील दोन दिवस हवामानाची स्थिती कशी राहते, यावरच नुकसानाचे चित्र स्पष्ट होणार आहे.