Created chaos at the counting centre after defeat : पराभवानंतर मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणे पडले महागात
Pune राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आक्रमक नेत्या आणि माजी राज्य प्रवक्त्या रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या दोन प्रभागांतून त्यांनी नशीब आजमावले होते, त्या दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
नेमके प्रकरण काय?
१६ जानेवारी रोजी मतमोजणी सुरू असताना रूपाली ठोंबरे आणि त्यांच्या काही समर्थकांनी मतमोजणी केंद्रावर प्रचंड गोंधळ घातला. मतमोजणी प्रक्रियेत हस्तक्षेप करत रूपाली ठोंबरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे समोर आले आहे. याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ठोंबरे यांच्यावर ‘सरकारी कामात अडथळा निर्माण करणे’ आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
Dissatisfaction in Shivsena : ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, दोन नगरसेवकांनी साथ सोडली !
रूपाली ठोंबरे यांनी पुण्यातून दोन जागांवर निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही प्रभागांतील पुणेकरांनी त्यांना नाकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे: १. प्रभाग २५: येथे भाजपच्या स्वप्नाली नितीन पंडित यांनी ठोंबरे यांचा १८,४५५ मतांच्या प्रचंड फरकाने पराभव केला. २. प्रभाग २६ (ब): या प्रभागात भाजपच्याच स्नेहा माळवदे यांनी ३,४९९ मतांनी ठोंबरे यांना धूळ चारली. एकाच वेळी दोन ठिकाणी पराभूत झाल्यामुळे आणि आता पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यामुळे ठोंबरे यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Shiv Sena symbol : “…म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!” शिवसेना पक्ष–चिन्ह प्रकरणावर पुन्हा आक्षेप
गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपाली ठोंबरे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मतमोजणी केंद्रावर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाच्या एका आक्रमक चेहऱ्याला भाजपच्या महिला उमेदवारांनी दिलेली ही मात पुण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.








