Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात !

Demand to register a case under the Atrocities Act : ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Nashik : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. नाशिक येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वन विभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने जाहीरपणे आक्षेप घेत “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?” असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून, गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या वादानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी त्यांच्या स्पष्टीकरणावर टीकेची झोड उठताना दिसत आहे.

ZP Elections: माजी आमदाराच्या घरासमोर काळी जादू करण्याचे साहित्य फेकले!

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “मला आज खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी कायम पुढाकार घेतो. अनेक नेते येतात, हार घालून निघून जातात, पण मी गावात, तालुक्यात जयंतीमध्ये उपस्थित राहतो. चाळीस वर्षांच्या राजकारणात मी कधीही बाबासाहेबांचा अपमान केलेला नाही. मातंग समाज, वाल्मिकी समाजासाठी मी कायम काम करतो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभा केला आहे. अनवधानाने नाव राहिले असेल, पण एवढा मोठा वाद कशासाठी हे मला समजत नाही,” असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलताना महाजन म्हणाले की, “मी गावात पंगत देतो, सर्व समाजातील लोकांसोबत जेवायला बसतो. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी बाबासाहेबांचे विचार जपणारा आहे. ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणताय, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करू नका. त्या भगिनी कोण आहेत हेही मला माहीत नाही. जामनेरमध्ये सर्व समाजाच्या पाठिंब्याने आम्ही निवडून येतो. शाम बडोदे यांना जळगावमधून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण आहे,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री महाजन यांच्या भाषणानंतर वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला होता. “भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित मंत्र्यांसमोर केला. या घटनेनंतर कार्यक्रमात काही काळ गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले.

Mayoral election : मुंबई महापौरपदावरून महायुतीत वाढला तणाव!

या घटनेनंतर दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत असून, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही जोर धरत आहे. त्यामुळे आगामी काळात या वादाचे राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.