BJP should make a Muslim the Prime Minister : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचे आव्हान; अकोल्यात काँग्रेस मेळावा
Akola “भाजप नेते मुस्लीम समाजाची काळजी घेत असल्याचे सांगतात, मग मुस्लीम व्यक्तीला पंतप्रधान वा राष्ट्रीय अध्यक्ष पदावर संधी का दिली जात नाही?” असा थेट सवाल करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका केली.
अकोल्यात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सपकाळ म्हणाले, “काँग्रेसच्या ८९ अध्यक्षांमध्ये सर्व जाती-धर्माचे, पुरुष-महिला, एससी-एसटी, आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन होते. काँग्रेसने कायम सर्वसमावेशक नेतृत्व दिले. भाजपनेही आता खऱ्या अर्थाने मुस्लिमांचे कल्याण करायचे असेल, तर त्यांच्या पैकीच एखाद्या व्यक्तीला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष किंवा पंतप्रधान करा.”
ते पुढे म्हणाले, “जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपला असून नरेंद्र मोदी ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. अशावेळी संघाच्या नावाच्या पाकिटांची वाट पाहण्याऐवजी भाजपनेच एखाद्या मुस्लीम नेत्याला संधी द्यावी. सरसंघचालक मोहन भागवत यांनाही आता विश्रांती द्यावी आणि त्यांच्या जागी आदिवासी किंवा दलित समाजातील व्यक्तीला संघचालक करा.”
Harshwardhan Sapkal : दलित, मुस्लीम किंवा महिला सरसंघचालक का नाही?
पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर हल्लाबोल करताना त्यांनी सांगितले की, “राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडवून ठेवण्यात आल्या आहेत. केवळ तीन नेतेच राज्य चालवत असून लुटारू व्यवस्थाच तयार झाली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीचे दर आधीच कोसळवण्यात आले. नुकसान भरपाई नाही, ठेकेदारांचे पैसे नाहीत, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत. राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.”
सपकाळ यांनी केंद्राकडे विशेष पॅकेजची मागणी करत म्हटले की, “जर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची मोदींकडे पत असेल, तर त्यांनी राज्यासाठी शेतकरी कर्जमाफीसह विशेष पॅकेज आणावे.
Vijay Wadettiwar : फाईली अडवा, एकमेकांची जिरवा; सरकारची नवी योजना !
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, “गांजा, अंमली पदार्थांचा काळाबाजार वाढत आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येत आहे. पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने पोलीस निष्क्रिय आहेत.”
या वेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, आमदार साजिद खान पठाण, डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, अजहर हुसेन, शाम उमाळकर, हिदायत पटेल, मदन भरगड, महेश गणगणे, डॉ. जिशान हुसेन, डॉ. अभय पाटील,हेमंत देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते








