Somnath Suryavanshi death case, Fadnavis government should stop pretending said Harshawardhan Sapkal : सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस प्रयत्न करणार.
Mumbai : परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला. असे असताना त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला, असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
यासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले, आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे. आता तरी फडणवीस सरकारने झोपेचे सोंग सोडावे. आता संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करणार आहे, का असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलीसांना व्यवस्थित हाताळता आले नाही. शहरात शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. त्यात अनेकांना जबर मारहाण झाली, अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करुन बेदम मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशानात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.
Harshvardhan Sapkal : मी शेंगा खाल्ल्या नाही, टरफलं उचलणार नाही !
परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन व लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला? मंत्रालयातून दिला का? की पोलीस महासंचालक कार्यालयातून दिला, याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री व मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस हे परभणीचे प्रकरण हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत. एका दलित तरुणाचा पोलिस मारहाणीत मृत्यू होतो. पण सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही.
भाजपा युतीचे सरकार दलित विरोधी आहे, हे स्पष्ट दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीला येऊन सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असेही सपकाळ म्हणाले.








