Congress demands strict action against MLA Sanjay Gaikwad : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल; कारवाईची मागणी
Mumbai आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिलाच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा सवाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, ‘महाराष्ट्रात सत्ताधारी आमदारांचा धुमाकूळ सुरू आहे आणि सरकारची पकड राहिलेली नाही. महायुतीच्या आमदारानी अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. संजय गायकवाड यांचे यापूर्वी कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले होते. या माणसाला वाचाळवीर ही पदवी उपमुख्यमंत्री यांनी दिली होती. ते सातत्याने बेताल वक्तव्य करत असतात.’
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला १ लाख रुपये बक्षीस देऊ, फडणवीसांच्या तोंडात कोविडचे जंतू घाला. असे हा वाचाळवीर बोलला होता. ही विक्षिप्त व्यक्ती आहे. कँन्टीनवाल्याची काही चुक असेल तर सरकारकडे तक्रार करून त्याचे कंत्राट रद्द करा. विशेष म्हणजे हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकाखाली सुरु आहे. नेहमी रामशास्त्री प्रभुणे सारखा आव आणणाऱ्या फडणविसांनी जागे व्हावे व कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरू असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसानं संयम बाळागावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा.
राहुल गांधी यांनी आज बिहारमध्ये मोर्चा काढला त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झालेली आहे आणि ही मतचोरी लपवण्यासाठी सरकार व निवडणुक आयोग नियम बदलत आहेत. महाराष्ट्रातील तोच मतचोरीचा पॅटर्न आता बिहारमध्ये राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे व नंतर तोच पॅटर्न भाजपा सर्व देशात वापरू शकतो. लोकशाहीत निवडणुका ह्या निष्पक्षपाती झाल्या पाहिजेत पण निवडणुक आयोगच सत्ताधारी भाजपासाठी काम करत असल्याचे चित्र आहे.’