harshwardhan-sapkal-compares-cm-devendra-fadnavis-with-aurangzeb : हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेने वातावरण तापले; आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
Pune काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात बोलताना सपकाळ यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीची तुलना थेट मुघल बादशहा औरंगजेब आणि नथूराम गोडसे यांच्याशी केली. या विधानानंतर सत्ताधारी भाजप आक्रमक झाला असून, दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
पुण्यातील या कार्यक्रमात सपकाळ यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. राज्यातील प्रशासकीय निर्णय, कायदा व सुव्यवस्था आणि विरोधकांना लक्ष्य करण्याच्या पद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सत्तेचा वापर लोकहितासाठी न होता केवळ राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीच्या प्रचाराचा संदर्भ देत ते म्हणाले की, फडणवीसांच्या ‘बुलडोझर’ नीतीपुढे केवळ काँग्रेसच ठामपणे उभी राहिली. त्यामुळेच माझ्याविरोधात कुभांड रचून, मी जे बोललो नाही ते माझ्या तोंडी टाकत जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचा गंभीर आरोपही सपकाळ यांनी यावेळी केला.
Uday Samant : मतदारांनी काँग्रेसचे ‘कपडे’ आधीच फाडलेत; उद्योगमंत्र्यांची टीका
सरकारची कार्यपद्धती लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याचा दावा करत सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाप्रमाणे क्रूर आणि नथूराम गोडसेप्रमाणे थंड रक्ताने ‘गेम’ करणारे नेते आहेत. त्यांना रेशीमबागेचा अजेंडा राबवून ‘बंच ऑफ थॉट्स’प्रमाणे देश चालवायचा आहे. निवडणूक आयोग, पोलीस आणि प्रशासन सध्या त्यांच्या खिशात आहे,” असे खळबळजनक वक्तव्य सपकाळ यांनी केले. काँग्रेसला मिळणारा मतदारांचा प्रतिसाद पाहून फडणवीस पूर्णपणे बिथरले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या विधानानंतर भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीची तुलना इतिहासातील वादग्रस्त पात्रांशी करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आणि गैरजबाबदार भाषा असल्याचे भाजपने म्हटले आहे.
Sunil Kayande : चिखला-काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा; निरपराधांवरील कारवाई थांबवा
सपकाळ यांनी या विधानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी लावून धरली आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.








