Buldhana placed fifth in DHO ranking : राज्यस्तरीय गुणांकन जाहीर; डीएचओ कार्यालयाची चमक, मात्र सिव्हिल सर्जन रँकिंगमध्ये सुधारणा आवश्यक
Buldhana महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयाने ऑक्टोबर २०२५ महिन्यासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर आधारित राज्यस्तरीय रँकिंग जाहीर केली असून, त्यात बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) कार्यालयाने ५६.२५ गुणांसह राज्यात पाचवे स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचे चित्र सकारात्मक दिसत असले, तरी जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन) कार्यालयाच्या रँकिंगमध्ये जिल्हा पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या या गुणांकनात डीएचओ कार्यालयाची कामगिरी समाधानकारक ठरली आहे. मात्र सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या बाबतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले आहे. गुणांकन सुधारण्यासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या जिल्ह्यांची स्वतंत्र यादीही आयुक्तालयाच्या पत्रात नमूद करण्यात आली आहे.
Municipal Corporation Elections : एकत्र लढायचे की नाही? युतीवरून भाजपात गोंधळाची स्थिती
या यादीत जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावर अमरावती, सोलापूर, नंदूरबार, हिंगोली आणि ठाणे (केवळ आरोग्य अधिकारी) तर जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. संबंधित जिल्ह्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीकडे अधिक लक्ष देऊन तातडीने सुधारणा करावी, असे स्पष्ट निर्देश आरोग्य सेवा आयुक्तालयाने दिले आहेत.
राज्यातील अव्वल पाच जिल्हे (डीएचओ रँकिंग)
धाराशिव : ६३.३० गुण
अकोला : ६२.२७ गुण
चंद्रपूर : ५९.१४ गुण
गोंदिया : ५६.९१ गुण
बुलढाणा : ५६.२५ गुण
कोणत्या घटकांवर झाले गुणांकन?
जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) कार्यालयासाठी माता व बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, पौगंडावस्थेतील आरोग्य तसेच वित्त व्यवस्थापन या घटकांच्या आधारे गुणांकन करण्यात आले आहे.
तर जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) कार्यालयासाठी शल्य चिकित्सा सेवा, पोषण, क्षयरोग (एनटीईपी), कुष्ठरोग (एनएलईपी), असंसर्गजन्य रोग (एनसीडी) कार्यक्रम, डायलिसिस सेवा, रुग्णालय व्यवस्थापन आणि वित्त व्यवस्थापन या बाबी निकष ठरल्या आहेत.
Municipal Corporation Elections : काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार?
आयुक्तालयाचे स्पष्ट निर्देश
आरोग्य सेवा संचालकांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देश देत, ज्या जिल्ह्यांची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही, त्या जिल्ह्यांच्या कार्यक्रम अंमलबजावणीचा सखोल आढावा घेऊन तातडीने सुधारात्मक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एकीकडे डीएचओ कार्यालयाच्या कामगिरीमुळे बुलढाण्याचा आरोग्य विभाग राज्यात चमकला असला, तरी सिव्हिल सर्जन कार्यालयाच्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्याचे आव्हान जिल्ह्यासमोर कायम आहे.








