Farmers blocked the highway, thousands took to the streets : ओला दुष्काळ व कर्जमाफीच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक
Mehkar राज्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना मदत व कर्जमाफीसंदर्भात सरकारकडून होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धडक आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले.
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विना अटी-शर्ती सातबारा कोरा, हेक्टरी किमान ५० हजार मदत, रखडलेले पीकविमा दावे तात्काळ मंजूर करणे, योजनांचे अनुदान वितरित करणे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी महामार्गावरच रास्ता रोको केला. यावेळी शेतकरी आणि संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला.
Zilla Parishad Election : नव्या पद्धतीमुळे दिग्गजांना बसणार फटका, डिसेंबरमध्ये निवडणुका?
पांडुरंग पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, “शेतकरी मृत्यूच्या दारात उभा असताना मदतीची घोषणा करून सरकारने केवळ साडेआठ हजार रुपये व दोन हेक्टरची मर्यादा ठेवल्याने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. खरी मदत हवी तर हेक्टरी किमान ५० हजार रुपये दिले गेले पाहिजेत.”
दरम्यान रखडलेले पीकविमा दावे, येलो मोसॅक रोगामुळे नाकारलेले विमा अर्ज आणि सौरऊर्जा योजनांतील भ्रष्टाचाराबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात महिलांसह वयोवृद्ध शेतकरी रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाला भावनिक स्वरूप आले. काही वेळ वाहतूकही ठप्प झाली.
शेतकऱ्यांचा रोष वाढू नये म्हणून उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी यांनी रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हा व तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी उपस्थित होते.
या आंदोलनामुळे मेहकर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, शेतकरी प्रश्नांवर राज्य सरकारला आता ठोस भूमिका घ्यावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








